पुणे:- अंतराळ विज्ञानाविषयी दूरदृष्टी बाळगून जनसामान्यांचे जीवन अंतराळ विज्ञानाने बदलेल असा विश्वास बाळगणारे भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज आपल्या सगळ्यांचे जीवन अंतराळ विज्ञानाने व्यापले आहे आणि ते समृध्द देखील झाले आहे, असे मत हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (एनआरएससी) संचालक डॉ. प्रकाश चौहान यांनी व्यक्त केले.
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या अंतरिक्ष महायात्रा अर्थात, ’पश्चिम महाराष्ट्र स्पेस ऑन व्हील्स’ या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश चौहान बोलत होते.सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवकुमार शर्मा, एनआरएससीच्या उपसंचालक डॉ. एन अपर्णा, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे प्रकल्प संचालक डॉ. पंकज प्रियदर्शी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, विज्ञान भारतीच्या पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ. नवीन कुमार, स्पेस ऑन व्हील या उपक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक नरेश चाफेकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे रजिस्टार डॉ.डी.एन.सोनवणे आणि या कार्यक्रमाच्या समन्वयक विभा व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एनआरएससीचे समूह संचालक डॉ. एम.ए. फिझी आणि विद्यार्थी सार्वजनिक पोहोच सुविधा, एनआरएससीचे प्रमुख डॉ. आर. श्रीनिवास यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या उपक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त अहवालाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पेस ऑन व्हील या बसचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात ढोलताशा आणि शंखानादाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. तसेच त्यावर ड्रोनव्दारे पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. यावेळी एम.विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (एनआरएससी) संचालक डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, डॉ. विक्रम साराभाई यांनी अंतराळ विज्ञानाचे स्वप्न पाहिले, तेव्हा आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती फारशी सक्षम नव्हती, तसेच जागतिक पातळीवरचे वातावरण देखील काहीसे अस्थिर होते. मात्र, साराभाई यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने आज खऱ्या अर्थाने गगनभरारी घेतली आहे. चांद्रयान मोहिमेसारख्या महत्त्वाच्या मोहिमांच्यावेळी इस्ऱो आणि अंतराळ विज्ञानाबद्दल जनसामान्य चर्चा करताना दिसतात. मात्र, अंतराळात उपग्रह सोडणे किंवा मोठ्या मोहिमा राबविणयाबरोबरच या उपग्रहांच्या माध्यमातून जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचे काम अंतराळ विज्ञान आणि इस्रो करीत आहे. आज आपल्याला मोबईलसारख्या तंज्ञत्रानामुळे मिळणाऱ्या सर्व सुविधांच्या मागे अंतराळ विज्ञानाची आणि इस्रोची महत्त्वाची कामगिरी आहे. आपल्या भोवतीची जंगले, पाणी, हवामान, बँकींग, विमा, कृषी, सागरी सुविधा यासह सगळ्या क्षेत्रांची अद्ययावत, अचूक आणि वेगवान माहिती उपग्रहांमुळे आपल्यापर्यंत पोहोचते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचा अहवाल देखील उपग्रहांच्या मदतीमुळे लवकर आणि बिनचूक देणे शक्य होते. अनेक वादळे येण्यापूर्वी उपग्रहाव्दारे मिळणाऱ्या अचूक माहितीमुळे आपण नुकसान टाळू शकतो. तसेच दरवर्षी पिकणाऱ्या कृषी उत्पन्नांची आकडेवारी आपल्याला आयात-निर्यात धोरण राबविण्यास मदतीची ठरते. त्यामुळे आंतराळ विज्ञान हे केवळ एका क्षेत्रापुरते आता मर्यादित राहिलेले नाही. गगनयान आणि शुक्रावरील आपली भरारीची स्वप्ने देखील येत्या काळात पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर अंतरिक्ष महायात्रा अर्थात, ’स्पेस ऑन व्हील्स’ यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत आंतरळ विज्ञानाची माहिती पोहोचविण्याचा उद्देश सफल होतो आहे, असे म्हणता येईल. यासाठी विज्ञान भारती या संस्थेने केलेले सहकार्य मोलाचे आहे. समाज प्रगत होण्यासाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक असून त्यादृष्टीने अंतरिक्ष महायात्रा हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
यावेळी बोलताना विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवकुमार शर्मा म्हणाले की, या अंतरिक्ष महायात्रेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला अंतराळ विज्ञानाविषयी माहिती मिळणे, त्याविषयी उत्सुकता वाटणे, प्रश्न निर्माण होणे आणि त्याच ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळणे, हा उद्देश सफल झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता निर्माण करणे आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे शिक्षकांचे खरे कार्य असते. विद्यार्थी जेव्हा प्रश्न मनात घेऊन एखाद्या विषयाकडे पाहतात, तेव्हा त्यांच्यात त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक असते. इस्त्रोने केलेली गगनभरारी आपण कायमच पहात आलो आहोत आणि अंतरिक्ष महायात्रा यासारख्या उपक्रमाव्दारे मातीशी नाते जोडण्याची आणि ते वृध्दींगत करण्याची इस्रोची भूमिका मोलाची आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा यासह पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमधील ४,१५,५२० हून अधिक अभ्यागतांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम एक विलक्षण प्रवास ठरला आहे. स्पेस ऑन व्हील्स मोबाईल प्रदर्शनाने स्पेस सायन्समधील इस्रोच्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन केले आणि विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्यांमध्ये उत्सुकतेची बीजे पेरली आहेत.
अंतराळ विज्ञानामुळे आपले जीवन समृध्द :- डॉ. प्रकाश चौहान,
