उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित पुस्तक स्टॉलचे उद्घाटन
दिल्ली: दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकांच्या स्टॉल क्रमांक १४ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटन समारंभात संवाद पुणेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणेचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंदजी जोशी यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक शेखर नाईक, मराठी साहित्य संमेलन प्रतिनिधी श्री. नरसिंग बिराजदार आणि श्री. श्रीमंत जाधव उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. मिलिंदजी जोशी म्हणाले, “नीलम ताई या चळवळीतल्या कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळा परिमाण लाभलेला आहे. समाजातील प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरे शोधणे ही त्यांची खासियत आहे. परिवर्तन घडवण्यासाठी काय करायला हवे, याचे भान त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने दिसते. मराठीतल्या उत्तम लेखिका म्हणून त्या नावारूपाला आल्या आहेत. त्यांच्या आरंभीच्या काळातील कथा आम्ही आजही विसरू शकत नाही.”
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत, स्टॉल क्रमांक १४ येथे हे पुस्तक स्टॉल उभारण्यात आले आहे. संमेलनात मराठी साहित्य प्रेमींना डॉ. नीलम गोऱ्हे लिखित दर्जेदार साहित्य खरेदी करण्याची आणि साहित्यविश्वातील नव्या प्रवाहांची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.