वरंधा घाटात बिबट्याचे दर्शन
भोर :महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगाव हद्दीत बिबट्याचा मुक्त संचार प्रवाशांना दिसून आला.अंकुश गंगाराम धामुनसे रा.हिर्डोशी (ता.भोर) व संतोष साबळे (पुणे) हे बिरवाडी (ता.महाड) येथे कामानिमित्त गेले होते. ते काम उरकून पुन्हा गावाकडे येत असताना घाटमाथ्यावरील द्वारमंडपहून पुढे आल्यावर शिरगाव हद्दीत त्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूला बिबट्या दिसला. म्हणून त्यांनी गाडी थांबवून थोडी मागे घेतली. तेवढ्यात तो बिबट्या रस्ता ओलांडून डाव्या बाजूच्या डोंगराकडे निघून गेला. रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ धामुनसे यांनी आपल्या मोबाईलमध्ये काढला आहे. बिबट्या ज्या दिशेने आला त्या बाजूला नीरा नदीचे उगमस्थान असलेले पाण्याचे कुंड आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठी बिबट्या कुंडावर गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भोर महाड मार्गावरुन दुचाकीसह वाहनांची रात्रदिवस वर्दळ असते. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. हिरडस मावळात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले असतानाच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.