आयटीसीटी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.
चिंचवड : एका वीस वर्षाच्या मुलाला लाथा – बुक्क्याने बेदम मारहाण करून तसेच त्याच्या गुप्तांगाला आयोडेक्स बाम लावून त्याचा व्हिडियो फ्रेंड्स व्हाट्सअप सर्कल या सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मारुंजी येथिल पनाची सोसायटी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी श्रेयस संजय कवडे, ललित प्रमोद भदाणे आणि राम तुळशीराम गंभीरे या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील तक्रारदार तरुण हा पनाची सोसायटी या ठिकाणी आपल्या मित्राच्या फ्लॅटमध्ये भेटायला गेला होता. त्यादरम्यान राम तुळशीराम गंभीरे या 35 वर्षाच्या आरोपीने तक्रारदार तरुणाच्या हातात सिगरेट दिली, मात्र ती सिगरेट तक्रारदार तरुणाच्या हातातून खाली पडली, त्यानंतर तक्रारदार तरुणाने राम गंभीरेला सिगरेट उचलून दिल्याने, राम गंभीरे याला तक्रारदार तरुणाचा अतिशय राग आला, तू माझी बरोबरी करतो का ? असं म्हणत राम गंभीरे यांनी तक्रारदार तरुणाला लाथा – बुक्क्याने तसेच त्याच्या हातातील धातूच्या कड्याने बेदम मारहाण करण्यास सुरू केली व त्यानंतर त्याच्या गुप्तांगाला आयोडेक्स बाम लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बनवून प्रसारित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हिंजवडी पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली .