मंदार काशीनाथ वाडेकर लिखित ‘जावे त्या देशा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : ’जावे त्या देशा’ या पुस्तकातून मंदार वाडेकर यांची तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, मानसिक संवेदनशीलता आणि रसिकता यांचे दर्शन घडते. लेखकाने केलेल्या प्रवासात घडलेल्या छोट्या छोट्या प्रसंगातून जीवनविषयक तत्त्वज्ञान अतिशय मार्मिकपणे मांडलेले दिसते. एखाद्या देशाचा, ठिकाणाचा इतिहास, संस्कृती, काळी सत्ये, माणसे याविषयीच्या लेखनातून त्या त्या ठिकाणचे पैलू वाचकांपर्यंत नक्कीच पोहोचतील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका, वक्त्या शेफाली वैद्य यांनी केले.
झंकार स्टुडिओ प्रकाशित आणि मंदार काशीनाथ वाडेकर लिखित ‘जावे त्या देशा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी वैद्य बोलत होत्या. सेवा भवन, नळस्टॉप जवळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झंकार स्टुडिओचे सत्यजित पंगू, उद्योजक राजेश मंडलिक व्यासपीठावर होते.
वैद्य पुढे म्हणाल्या, पर्यटक म्हणून एखाद्या ठिकाणाच्या, देशाच्या चांगल्या गोष्टीच जाणवतात; परंतु अनेक काळाच्या वास्तव्यानंतर त्या जागेचे कंगोरे टोचायला लागू शकतात. यातून शहरांचे, भवतालाचे नाते प्रगल्भ होत जाते तसेच देशात, संस्कृतीत रुळायला मदत होते. वाडेकर यांच्या लेखन प्रवास हा त्या त्या ठिकाणांमध्ये रुजत आणि रुजवत चाललेला असल्याचे जाणवते. लेखकाचा प्रवास आणि त्याविषयीचे लेखन हे संवेदनशीलतेने बारकावे शोधत, ते नाजूकपणे टिपून ठेवत लिहिले आहे हे जाणवते. ‘जावे त्या देशा’ या ऑडिओ बुक आणि ई-बुकचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले.
मंदार वाडेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, एखाद्या ठिकाणाचा इतिहास, भूगोल, दु:ख, आनंद, माणसे समजून घ्यायच्या आवडीतून माझा लेखन प्रवास घडला. कोकणातून आलेल्या माझा नोकरीच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये प्रवास घडला. त्यावेळी केलेल्या सूक्ष्म निरिक्षणातून आणि आलेल्या अनुभवांतून माझ्या विचार शैलीचे प्रकटीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून घडले आहे. हे माझ्या अंतरीचे प्रकटीकरण आहे.
प्रवास हे एक विद्यापीठच असते असे सांगून राजेश मंडलिक म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाची निरिक्षण शक्ती, संवदेनशील मन, माणसांविषयी-निसर्गातील घटकांविषयी औत्सुक्य असल्याचे जाणवते.प्रास्ताविकात सत्यजीत पंगू म्हणाले, हे पुस्तक म्हणजे फक्त प्रवासवर्णन नव्हे तर हा एक प्रवाही प्रवास आहे.मान्यवरांचे सत्कार मंदार वाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिल्पा देशपांडे यांनी केले.