उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात निलंबित पोलीस अधिकारी कसा ?
बसप प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादींचा सवाल
एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देण्याची मागणी
पुणे:-परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विंटबनेनंतर भीमसैनिकांवर पोलीस दलाने केलेल्या अत्याचाराच्या जखमा अद्यापही ताज्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घालून दोषी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करीत आंबेडकरी अनुयायांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा सरकारी प्रयत्न केला होता. पंरतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत का? परभणी प्रकरणातील निलंबित एलसीबी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडला सरकारचे संरक्षण आहे का? असे धक्कादायक सवाल बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज,रविवारी उपस्थित केले.
परभणीतील घटनेनंतर निषेध करणारा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणानंतर घोरबांडला निलंबित करण्यात आले होते.असे असताना देखील हा निलंबित पोलीस अधिकारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यात दिसत असेल, तर ही बाब गंभीर आहे. या अधिकाऱ्यावर सरकारचा वरदहस्त आहे का? असा सवाल यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओसंबंधी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली.सोमनाथ प्रकरणाचा वापर सत्ताधारी पक्षांनी राजकीय प्रतिस्पर्धेसाठी करू नये,अशी स्पष्ट भूमिका बसपची असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आणखी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले,तरी त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अद्यापही दाखल करण्यात आलेला नाही. सरकारने नुकतीच पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुरनर,पोलीस कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण आणि राजेश जठाल यांना निलंबित केले आहे.कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी अद्यापही सरकारने पुर्ण केलेली नाही.या सर्वांवर गुन्हा दाखल करीत त्यांना सेवेतून बर्खास्त करावी,अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.
……….