पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात संक्रातीचा उत्सव
पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे आयोजित तिळगुळ समारंभ उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सभासदांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात संक्रातीचा उत्सव, हळदी-कुंकू आणि तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरी मुणगेकर, कार्यवाह बळवंत भाटवडेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर यांच्यासह कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे अनेक सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील गीताचे सादरीकरण डॉ. राजश्री महाजनी यांनी केले. वेदवती मुणगेकर, अद्वैता उमराणीकर, डॉ. राजश्री महाजनी यांनी ज्येष्ठांचे औक्षण केले. सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप सहकार्यवाह दीपक भडकमकर यांच्या हस्ते झाले.
तिळगुळ समारंभानिमित्त सारेगमफेम मृदुला मोघे यांचा एका पेक्षा एक हा एकपात्री बहुरूपी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोघे यांनी प्रहसनाच्या माध्यमातून मॉडर्न सून आणि सासूचा मजेशीर संवाद, मुंबईकर चाकरमानी महिलांचे लोकलमध्ये साजरे होणारे सण-समारंभ, आमदार सौभाग्यवतींच्या तोऱ्याच्या सुरस कथा, संगीत नाटकातील सखीच्या भूमिकेचे विडंबनात्मक सादरीकरण तर 85 वर्षांच्या आजीची ज्योतिषाला भेट अशा सादरीकरणातून उपस्थितांना हलक्या-फुलक्या मनोरंजनाची मेजवानी दिली. मोघे यांनी सुप्रसिद्ध मराठी गीतेही प्रभावीपणे सादर केली. मोघे यांच्या सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
मृदुला मोघे यांचा सत्कार मुक्ता चांदोरकर यांनी केला. ज्येष्ठांच्या मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन हरी मुणगेकर यांनी केले. बळवंत भाटवडेकर यांनी आभार मानले.