शिवजयंती निमित्त आयोजित पदयात्रा सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजनाद्वारे यशस्वी करावी- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
पुणे- शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शिवजयंती निमित्त ‘ जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पुण्यात १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारी पदयात्रा सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करुन समन्वयाने यशस्वी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
शिवजयंती दिनी होणाऱ्या पदयात्रेच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर आयुक्त सामान्य प्रशासन समीक्षा चंद्राकार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, क्रीडा विभागाच्या सहायक संचालक भाग्यश्री बिले, मनपा उपायुक्त किशोरी शिंदे, तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय,उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण, पोलीस विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नेहरु युवा केंद्र तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शिवजयंती निमित्त आयोजित पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. पदयात्रा शनिवार वाडा ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गावर काढण्यात येणार आहे. या पदयात्रेमध्ये शाळा, महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था यांचे सुमारे वीस हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महानगरपालिका, पोलीस विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र, यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विभागांनी त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.
यावेळी पिण्याचे पाणी, पदयात्रा मार्गावरील स्वच्छता, वाहतुकीचे सनियंत्रण, पदयात्रा मार्गावर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावणे, सहभागी युवांना टी शर्ट व टोपी, पारंपरिक वेषभुषेत युवांना पदयात्रेसाठी निमंत्रित करणे, कार्यक्रम पत्रिका, मान्यवरांना निमंत्रण, स्वयंसेवक, पदयात्रा मार्गावर वैद्यकीय पथक नेमणे, विद्यार्थ्यांना अल्पोपहार पुरवणे आदीबाबत आढावा घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुलकुंडवार यांनी केले आहे.