उद्या भोरमध्ये आंबेडकरी चळवळीकडून निषेध मूक मोर्चाचे आयोजन
पुणे : भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड याची 8 फेब्रुवारी रोजी झालेली हत्या ही आंतरजातीय विवाह केल्यामुळे करण्यात आल्याने सदर प्रकार हा ऑनर किलिंगचा असून त्या दृष्टीने तपास होवुन सर्व संबंधितांना अटक व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. तसेच याच मुद्दावर मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भोर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मूक मोर्चाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहीतीही यावेळी पत्रकार परिषदेद्वारे संबंधित नेत्यांनी दिली.
विक्रम गायकवाड या तरुणाने लगतच्या गावातील सवर्ण समाजाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. सदर आंतरजातीय विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नसल्याने विवाह मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटूंबीयांनी केला होता तसेच मुलीला व विक्रमला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. विक्रमचे कुटुंबीयांनी हत्या होण्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडे वियक्त केली होती परंतु त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले व दुसर्याच दिवशी हता करण्यात आल्याने या प्रकरणी पोलिसांची भुमिका संशयास्पद वाटत आहे.
या घटनेला दहा दिवस लोटल्यानंतर सुद्धा पोलीस तपास हा अत्यंत चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे पोलीस उपाधीक्षक भोर यांच्याशी झालेल्या चर्चेतून शिष्टमंडळाला जाणवल्याने निषेध मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात येत असून या मोर्चात हजारो लोक सहभागी होणार आहेत.
धम्मभूमी भोर येथून सुरू होणारा हा मोर्चा संपूर्णतः मूक मोर्चा असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ याची निषेध सभा घेवुन सांगता होणार आहे व यावेळी प्रतिनिधी स्वरूपामध्ये भाषणे होऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार व इतर अधिकार्यांना देण्यात येणार आहे.
विक्रम गायकवाड हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार असून सदर मागणीच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे.
सदर मोर्चा मध्ये संविधान वादी व दलित अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात येत असल्याचे अवाहन रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. यावेळी पीडीत कुटूबींयातील फिर्यादी विठ्ठल गायकवाड , मोर्चाचे आयोजक प्रविण ओव्हाळ, विनोद गायकवाड , बाळासाहेब अडसुळ आदि उपस्थित होते.