राज्यातील काराग्रहात ५०० कोटी रूपयापेक्षा जास्त रक्कमेचा घोटाळा : राजू शेट्टी.
पुणे ( प्रतिनिधी)
राज्यातील काराग्रहामध्ये सन २०२३ ते २०२५- २०२६ या वर्षांमध्ये रेशन , कॅंन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास ५०० कोटी रूपयाहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाला असून यामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिका-यांच्या सहभागाने झाली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथे पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील काराग्रहामध्ये कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रूपये खर्च करत असते. रेशन व कॅंन्टीन मधून काराग्रहातील कैद्यासाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ , साखर ,डाळी , दुध , फळे ,भाजीपाला ,कांदा , बटाटा, चिकन -मटण , अंडी , बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात. राज्य सरकारच्या काराग्रह विभागाने सेंट्रलाईज पध्दतीने निविदा प्रक्रिया करून राज्यातील सर्व काराग्रहांना रेशन व कॅंन्टीन मधील साहित्याची खरेदी करत असते. सेंट्रलाईज पध्दतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाठ वाढविलेले असून मंत्रालयीन व इतर उपहारग्रहामध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य व कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरामध्ये जमीन आसमानंचा फरक आहे. त्याबरोबरच याचपध्दतीने विद्युत उपकरणांसह अन्य काराग्रहात लागणा-या साहित्याची खरेदी केली जाते. या खरेदीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून यामध्ये अधिकारी यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. याबरोबरच सदरची खरेदी होत असताना गुणवत्तापुर्ण व उच्च प्रतीचा माल पुरवठा करणे बंघनकारक असताना अनेक काराग्रहात नाशवंत , मुदतबाह्य , निकृष्ठ , सुमार दर्जाचे , बुरशीजन्य माल पुरवठा केला असल्याचे काराग्रह अधीक्षकांनी व कारागृहातील कैद्यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात कळविल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही.
काराग्रहामध्ये रेशन विभागात खरेदी करण्यात आलेल्या गहू , तांदूळ , साखर , मीठ , पोहे ,गुळ याच्या खरेदीमध्ये प्रतिकिलो ११ रूपयापासून ते ३० रूपायापर्यंत जादा दराने खरेदी केले असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी (तूरडाळ ,मसूर डाळ ) चहा पावडर यासारख्या वस्तूमध्ये बाजारभावापेक्षा प्रतिकिलो ११० रूपये ते २५० रूपये प्रतिकिलो जादा दराने खरेदी करण्यात आले आहेत. काराग्रहामध्ये रेशन व कॅंन्टीन साहित्याबरोबरच जनरेटर, वाशिंग मशिन , ड्रोन कॅमेरा , प्रिंटर , कुलर , यामधील खरेदी दरात मोठी तफावत दिसून आली आहे. यापध्तीने अधिकारी व काही ठेकेदार मिळून कारागृहात दरवर्षी करोडो रूपयाचा चुराडा केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही राज्य सरकार अथवा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे काराग्रहातील अधिकारी माजलेले असून हप्ते खालीपासून वरपर्यंत पोहचविल असल्याने आमचे कुणीच वाकडे करू शकत नाही या अविर्भावात वावरू लागले आहेत.
दिवाळीमध्ये कैद्यांना खरेदी केलेल्या फराळाचे दर तर गगनाला भिडणारे व बाजारातील नावाजलेले कंपन्यांचे होते. कैद्यांना मात्र स्थानिक बाजारातील निकृष्ठ दर्जाचे लाडू , चिवडा व इतर फराळाचे साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे.राज्यातील अनेक काराग्रहात अन्न भेसळ विभागाने धाडी टाकल्या यामध्ये रेशन व उपहारगृहातील निकृष्ठ दर्जाच्या मालाचे नमुने अहवाल सादर केले. तरीही यामध्ये काराग्रहास माल पुरवठा करणा-या ठेकेदाकडून कोणतीच सुधारणा करण्यात आली नाही. याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले कि काराग्रहात कैद्यांना दिले जाणारे जेवण व उपहारग्रहातील साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे व भेसळ असते याचा मी येरवडा कारागृहात कैदी म्हणून असताना प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.पाणचट चहा , कच्चा चपात्या ,न शिजवता दिला जाणारा भात , चटणी व मीठ नसलेल्या भाज्या व आमटी, बुरशीजन्य बेकरी पदार्थ कैद्यांना दिले जात होते. याबाबत मी कारागृह अधिका-यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की जर चांगले जेवण कैद्यांना दिले तर याठिकाणी कैदी बंदी करण्यास जागा पुरणार नाही ही एक प्रकारची शिक्षाच असल्याचे सांगितले. याबाबत राजू शेट्टी यांनी संबधित काराग्रह अप्पर पोलिस महासंचालक यांना लेखी तक्रार करूसुध्दा संबधित भ्रष्ट लोकांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.
या घोटाळ्यांसंदर्भात कारणीभुत असलेल्या तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची राजू शेट्टी यांनी मागणी केली.