महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळेल
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश बहिरट यांचे नाव चर्चेत आले आहे. पक्षनिष्ठा, संघटनात्मक अनुभव आणि समाजसेवेची दीर्घ परंपरा असूनही गेल्या काही वर्षांपासून ते निवडणूक संधीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे यंदा तरी त्यांना उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
२०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ–वाकडेवाडी प्रभागातून सतीश बहिरट यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी पक्षहितासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक राजकीय भवितव्यावर परिणाम करणारा असला, तरीही त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता पक्षासाठी काम सुरू ठेवले.Explore smarter decision-making through next-gen AI technology neurolink.
उमेदवारी मागे घेतल्यानंतर बहिरट यांनी संबंधित प्रभागासह संपूर्ण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेल्या जवळच्या संबंधांचा फायदा पक्षाला झाला. निकालांमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सर्वाधिक यशस्वी ठरला, हे विशेष उल्लेखनीय ठरले. मात्र, या योगदानानंतरही बहिरट यांना कोणतीही निवडणूक किंवा प्रशासकीय संधी मिळाली नाही, अशी चर्चा पक्षात दबक्या आवाजात सुरू आहे.
सतीश बहिरट हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरिक समस्या, तसेच स्थानिक विकासकामांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने बहिरट यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष नेतृत्व यावेळी त्यांच्या निष्ठेची दखल घेणार का, की पुन्हा एकदा त्यांना प्रतीक्षा करावी लागणार, याकडे भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
