पुणे : पक्षनिष्ठा आणि शिस्त यांचे जिवंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आले असून, भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते सतीश बहिरट यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली होती, मात्र बहिरट यांच्या भूमिकेमुळे त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
पक्षाची शिस्त राखण्यासाठी आणि संघटनात्मक एकजूट टिकवण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्त्वाची असते, हे बहिरट यांनी कृतीतून दाखवून दिले. आपण कष्टाने वाढवलेल्या पक्षासाठी यापूर्वीही उमेदवारी सोडली आहे, आणि आज त्यात आणखी एका त्यागाची भर पडली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निष्ठावान चेहरेच जर संपले, तर पक्षाची विचारधाराही टिकू शकणार नाही, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
२०१७ प्रमाणेच २०२५-२६ या कालावधीतही बहिरट यांची उमेदवारी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले बहिरट हे तळागाळातील कार्यकर्ते व मतदारांशी थेट संपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात. स्थानिक पातळीवर पक्षाचा विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते जर पक्षाविरोधात उभे राहिले असते, तर त्याचा मोठा फटका पक्षाच्या मतदानाला बसला असता, अशी चर्चा कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये सुरू होती.
मात्र पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने पक्षातील एकजूट अधिक बळकट झाली आहे. वरिष्ठांकडून यंदाच्या वर्षी बहिरट यांना यथोचित सन्मान दिला जाईल, अशी खात्री कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. बहिरट यांच्या माघारीनंतर प्रभागात पुन्हा एकदा भाजपमय वातावरण निर्माण झाले असून, पक्षनिष्ठेचे हे उदाहरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
