पीएमआरडीएच्या पथकाकडून अनाधिकृत बांधकामावर कारवाई
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाकडून भिमा कोरेगावात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या पथकामार्फत २९ जानेवारीपासून सातत्याने अनाधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई सुरु आहे.
सोमवारी (दि.10) भिमा कोरेगाव (ता. शिरुर) मधील अनाधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील एकूण 55 अतिक्रमित व अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यात दुकाने, आरसीसी स्ट्रक्चर, सीमा भिंती, तात्पुरते पत्राशेड, होर्डिंग्ज आदी हटविण्यात आले. गेल्या काही दिवसापासून सातत्याने कारवाई सुरू असल्याने सदर ठिकाणच्या जवळपास शंभर अतिक्रमणधारकांनी स्वतः आपली अतिक्रमणे काढून घेत पीएमआरडीएच्या पथकाला सहकार्य केले. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल.
सदर कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाच्या सह आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता दिप्ती घुसे, प्रतिम चव्हाण, अभिनव लोंढे, विष्णू आव्हाड, गणेश जाधव, हरीश माने, सागर जाधव, दीपक माने, प्रशांत चौगुले, प्रणव डेंगळे, ऋतुराज सोनावणे, तेजस मदने यांनी पार पाडली.