पुणे : We Are Together Social Foundation या नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक संस्थेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भव्य The Folk आख्यान या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोककला, संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या या कला प्रकारांना मोठ्या व्यासपीठावर स्थान देऊन त्यासाठी पुढील काळात काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष बाबुराव भोर, सचिव देवेंद्र धनोकर, खजिनदार राहुल धोंगडे, सल्लागार अँड. केतन कदम, तसेच विश्वस्त मयुरेश नाईक, उदय नगरकर, विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. लोककला आणि संस्कृतीला योग्य व्यासपीठ देण्याचा संस्थेचा हेतू असून, या उद्दिष्टाने The Folk आख्यान या पारंपरिक कला प्रकाराला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली.
कार्यक्रमाला समीर बेलवलकर, एड. एस. के. जैन, तेजराज पाटील, समीर गाढवे, असे अनेक उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच चित्रपटसृष्टीतून भाऊ शिंदे, भूषण प्रधान, सायली पाटील, नेहा सोनवणे, तृप्ती मोरे, मदन देवधर यांसारख्या अनेक कलाकारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरले ते नामांकित अभिनेते रवी काळे. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत सरकार, सरकार राज, काला अशा शंभरहून अधिक चित्रपटांत दमदार भूमिका साकारणाऱ्या रवी काळे यांनी मराठी चित्रपटांमध्येही नातीगोती, पारध, पिपाणी, दशावतार या चित्रपटातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. अशा बहुआयामी अभिनय प्रवासाचा गौरव म्हणून We Are Together Social Foundation तर्फे त्यांना महाराष्ट्राचा अभिमान हा सन्मान देवून विशेष सत्कार करण्यात आला.
लोककला आणि समाजकार्याचा सुंदर मेळ घालून या संस्थेने केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी सांगितले. पुढील काळात संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची व लोककलेच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष बाबुराव भोर यांनी दिली.
