शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा
पुणे:महाराष्ट्र राज्यातील खाजगी शिक्षण संस्था या शिक्षण व्यवस्थेचा कणा असून त्यांच्या मुलभूत गरजांची पूर्तता होत नसेल, तर हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे सरकारने या शिक्षण संस्थांकडे तातडीने लक्ष देऊन हे प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा सरकाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. ‘संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण’ या संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे कार्यकारी सचिव विजय गव्हाणे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, सहसचिव अॅड. संग्राम देशमुख, मानद सचिव प्रमिला गायकवाड, सचिव शिवाजी घोगरे, राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, वेतनेतर अनुदान हे चालू असलेल्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सातव्या वेतन आयोगा प्रमाणे मिळाले पाहिजे.शिक्षकांची रिक्त पदे ही चालू वर्षाच्या म्हणजे 24-25 च्या संचमान्यतेनुसार वर्षातून दोन वेळा भरण्यासाठी पवित्र प्रणालीवर संधी मिळाली पाहिजे.
शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती त्वरित करण्यात यावी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी पूर्वीप्रमाणे मिळावेत.
शालेय पोषण आहार शालेय पुस्तके किंवा गणवेश हे अनुदानित बरोबरच विनाअनुदानित शाळातील मुलांना देखील मिळाले पाहिजे.प्रॉपर्टी टॅक्स लाईट बिल किंवा पाणी बिल यातून शालेय संस्थांना सवलत मिळाली पाहिजे. यासह विविध मागण्या सुप्रिया सुळे यांच्याकडे यावेळी मांडण्यात आल्या. या मागण्यांसदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले. तसेच मिळतरकरा संदर्भातउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. या दोन्ही स्तरांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी दाद मागण्यात येईल.यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासीक व्यक्तीमत्वे आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास बालभारतीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच संविधान आणि आपले मुलभूत अधिकार याविषयी जनजागृती आणि प्रबोधन होण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजे. भारताचा आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा इतिहास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि मनोरंजक पध्दतीने विद्यार्थ्यांपुढे मांडून राज्यापुढे एक यशस्वी प्रारूप आपण प्रस्थापित केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते यांनी करून विद्यार्थ्यांसाठी समर्पित असलेल्या यशोगाथा प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे मा. सचिव अजित वडगावकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.