शिवजयंती दिनी शिवप्रेमींना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
पुणे: आगामी शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पुरेसे पिण्याचे पाणी, वैद्यकीय उपचार, औषधे आदी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
शिवजयंतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनावणे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार सुनिल शेळके, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व विभागांनी सतत समन्वयात रहावे. किल्ल्याची साफसफाई चांगल्या प्रकारे होईल यासाठी आवश्यक ती साधने पुरवावीत. नागरीकांना पुरविण्यासाठीच्या पिण्याच्या पाण्याची दोनदा तपासणी करावी. शिवजयंतीसाठी गतवर्षी आलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेत यावर्षीचा अंदाज घेऊन शौचालयांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या बूथवर मुबलक औषधे व ओआरएसची पाकिटे ठेवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले, किल्ल्याची सर्व स्वच्छता पुरातत्व विभागाने करावी, नगर परिषदेने स्वच्छ पाणी पुरवठा करावा, राज्य परिवहन महामंडळाने चांगल्या बसेस पुरवाव्यात, शिवजयंतीच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यांची काळजी घ्यावी. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने नेहमीसारखे स्थानिक नागरिकांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी आमदार श्री. सोनवणे यांनीही विविध सूचना केल्या.