अनिता माने यांचा गौरव केला जाणार
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त गुरुवारी प्रेमकवी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या प्रेमकवी पुरस्काराने प्रसिद्ध कवयित्री अनिता माने यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध लेखिका व कवयित्री डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रेम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात कांचन सावंत, डॉ. ज्योती रहाळकर, सुजित कदम, कविता क्षीरसागर, चंचल काळे, जयश्री श्रोत्रिय, केतकी देशपांडे, निरूपमा महाजन, विजय सातपुते, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, प्रभा सोनवणे यांचा सहभाग असणार आहे, असे रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.