बसप प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादींचे आवाहन
पुणे:-बहुजनांचे कैवारी, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतिक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढण्याची हिंमत कुणाची होतेच कशी? असा सवाल बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.१) उपस्थित केला.समाजविघातक विचारांना मंत्र्यांकडून मिळणारे ‘राजाश्रय’ याला कारणीभूत आहे का?, याचे विश्लेषण करण्याची वेळ आता राज्य सरकारवर आली आहे. महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तथाकथित प्रशांत कोरटकर नावाचा इसम अद्याप ही फरार आहे, हे गृहखात्याचे अपयश आहे.राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा कोरटकरला फायदा होतोय का?, हे तपासण्याची आवश्यकता असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.
वैचारिक लढा हा विचारांनी लढला जातो, धमक्या देवून, मारहाण करून नाही. प्रत्येकाला योग्य शब्दांमध्ये आपले मत समाजात ठेवण्याचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, कुणीही उठसूठ या अधिकाराचा दुरुपयोग करत सामाजिक वातावरण कलुषित करेल, असा त्याचा अर्थ होत नाही. महाराजांना आणि त्यांच्या बहुजन हितकारक विचारांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती, मानसिकतेवर वेळीच वेसण घालण्याची गरज आहे. बहुजन एकतेनेच हे शक्य आहे. एकत्रित येवून अशा ‘ राजकीय व्यावसायिक तथाकथितांना’ अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने देखील अशांना तत्काळ बेड्या ठोकल्या पाहिजे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
राज्यात सांस्कृतिक राजधानीत गुंडगिरीचा ‘हैदोस’
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टॅन्ड मध्ये युवतीवर बलात्कार, कोयत्या गॅंगची दहशत, चैन स्नेचिंग, असुरक्षित महिला, मारहाण, चोऱ्यामाऱ्या, हत्या अशा नित्यदिनक्रमाने राज्याची सांस्कृतिक राजधानी हादरली आहे. पुण्यात गुंडगिरीने अक्षरश: हैदोस मांडला आहे. गृह खाते मात्र गप्प आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या शहराची ही स्थिती बदलण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले आहे. सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या शहराला प्रशासकीय दुर्लक्षाच्या झळा बसत आहेत. गावगुंडांसह असामाजिक तत्वांना वेळीच ओळखून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकाव्यात आणि शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची गरज असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
……..