- ‘लोक – जैवविविधता नोंदवही’ पुस्तिकेचे प्रकाशन
पुणे, प्रतिनिधी – “जैवविविधता सगळीकडे सारखी नसते. केवळ धार्मिक भावनेने देवराईकडे पाहणे उचित नाही. देवराईमुळेच जैवविविधता टिकून आहे. त्यामुळे तेथील जलस्रोत्र, औषधी वनस्पती, वन्यजीव संरक्षित होतात. हे सर्व वैभव देवराईमुळे आहे. पूर्वी देवराईत शिकार करायची नाही, अशी एक धारणा होती. पण आता धार्मिकताही कमी होत असून तिचे महत्त्व माहिती नसल्याने देवराई नष्ट होऊ लागली आहे,” अशी खंत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केली.
वनराई प्रकाशित ‘लोक – जैवविविधता नोंदवही’ हे पुस्तक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर यांनी लिहिले असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वनराई संस्थेत पार पडला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते याचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. माधव गाडगीळ, विजय एदलाबादकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवाजी तोफा आणि माजी खासदार ऍड. वंदनाताई चव्हाण, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, सचिव अमित वाडेकर यावेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, “जैवविविधता संपन्न प्रदेश म्हणून वा. द. वर्तक सरांनी देवराईची ओळख करून दिली. जैवविविधता कायदा २००२ मध्ये मंजूर झाला. पण वन विभागाने या कायद्याची नीट अंमलबजावणी होऊ दिली नाही. त्यांनी स्थानिकांवर खूप अटी टाकल्या. त्यामुळे सुरवातीला या नोंदवहीला थंड प्रतिसाद होता. परंतु २०२० नंतर भराभर नोंदवही भरू लागल्या. त्या कशाही भरून नोंदवह्या सादर केल्या. ‘एनजीटी’नेदेखील त्याला छान झालंय असे सांगितले. पण सर्व काही निरर्थक झाले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, लोकांचा स्वार्थीपणा आणि अडाणीपणा दूर करता आला पाहिजे. ज्ञान कसे वापरावे याचे तारतम्य माणसाकडे नाही. जगातला पहिला पर्यावरणवादी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. जैवविविधता म्हणजे केवळ झाड-झाडोरा, पशू-पक्षी, कीटक इत्यादींचे निरनिराळे प्रकार एवढेच नव्हे; तर जग हीच मुळात जैवविविधता आहे. बहुविविधता जिथे नसेल ते जगच नाही. या जैवविविधतेच्या जाळ्याने संपूर्ण सजीवसृष्टी बांधली गेली असून त्यावर आपलेही अस्तित्व अवलंबून आहे.
एदलाबादकर म्हणाले, “१९९८ मध्ये जैवविविधता कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यात स्थानिकांची भूमिका असावी असा प्रवाह होता. तो अनेकांना मान्य नव्हता. पण स्थानिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक होता. लोकांनी जैविविधतेची नोंद करावी, असे ठरविण्यात आले. पण गेल्या काही वर्षांत राज्यात या जैवविविधता नोंदीवहीमध्ये केवळ झेरॉक्स सारखे काम झालंय. जर असे काम झाले तर ते वाईट आहे.
ॲड वंदना चव्हाण म्हणाल्या की, लोकांचा सहभाग कुठेही स्थानिक शासन नोंदवत नाही. मात्र लोक सहभाग महत्वाचा आहे. बीडीपीसाठी आम्ही खूप लढलो. जैवविविधता टिकविण्याची गरज असून हवामान बदलामुळे समाजात खूप काही गोष्टी बदलत आहेत. पूर्वीचा पावसाळा आल्हादायक आणि आनंद देणारा होता. हल्ली पावसाला आला की धडकी भरते. राजकीय व्यक्तींना जोपर्यंत जैवविवीधतेचे महत्व कळत नाही, तोपर्यंत हा कायदा नीट राबविला जाणार नाही.
सागर धारिया म्हणाले की, ‘लोक-जैवविविधता नोंदवही’ जास्तीत जास्त ग्रामपंचायत पर्यंत पोहचवणे आणि याचा उपयोग करून पर्यावरण रक्षण करणे हि वनराई संस्थेने प्राथमिकता बनवली आहे. सजग आणि जाणकार जनतेच्या सहभागाने आपल्या गाव-शहरातील जैवविविधतेची यादी कशी करता येऊ शकते याबद्दलची रूपरेषा मांडणारे हे एक दिशादर्शक पुस्तक आहे.
अमित वाडेकर म्हणाले की, जैवविविधतेच्या नोंदवहीबद्दल जागरूकतेचा अभाव, माहिती संकलनाचे स्रोत, पद्धती आणि एकूणच प्रक्रियेबद्दल अनभिज्ञता यांमुळे मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ‘लोक-जैवविविधता नोंदवही’बाबत फारसे समाधानकारक चित्र आढळत नाही. म्हणूनच यासंदर्भात सर्व स्तरांमध्ये लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी या मार्गदर्शनपर पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.