घाटकोपर येथे वाहतूक कोंडी विरुद्ध नागरिकांचे शिट्टी वाजवा आंदोलन
मुंबई : घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील जागृती नगर मेट्रो स्थानक ते साकीनाका जंक्शन दरम्यान सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रवासी,वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक ते दीड किलोमीटरच्या अंतरासाठी वाहनांना अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागत आहे. लहान मुले, महिला तसेच वयस्कर लोकांना या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. या बाबत प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी दिल्या परंतु यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आता सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी शिट्टी वाजवा हे अनोखे आंदोलन उभारून जनतेचा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी मोकळा श्वास अभियानच्या नेतृत्वात शिट्टी वाजवा हे अनोखे आंदोलन केले. यावेळी जागृती नगर मेट्रो स्थानका जवळ मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध घोषणा देऊन शिट्टी वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.मोकळा श्वास अभियानचे राजेश सावंत यांनी या वेळी हे सांविधानिक आंदोलन असून पुढे जर हा प्रश्न सुटला नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. राजेश सावंत(मोकळा श्वास अभियान अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.