माऊंटअबूवरील गुरूशिखरावर वेधशाळा बांधून टेलिस्कोपचीही निर्मिती
पुणे : डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांनी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे भारतातील पहिल्या अवरक्त किरण खगोलशास्त्र या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. माऊंटअबूवरील गुरूशिखरावर वेधशाळा बांधून टेलिस्कोपचीही निर्मिती केली आहे. डॉ. कुलकर्णी आपल्या कामाप्रति शिस्तप्रिय आणि जिद्दी शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘ॲरो ऑफ (माय) टाईम’ या इंग्रजी आत्मचरित्राचा डॉ. संगीता गोडबोले यांनी केलेला भावानुवाद मनाची पकड घेणारा असून डॉ. कुलकर्णी यांचे व्यक्तिचित्रण आणि कार्य या पुस्तकातून आपल्या समोर येते, असे प्रतिपादन अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी केले.
खगोलभौतिकशास्रज्ञ डॉ. पी. व्ही. कुलकर्णी लिखित ‘ॲरो ऑफ (माय) टाईम’ या मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा ‘माझ्या काल-शराचा प्रवास’ या डॉ. संगीता गोडबोले यांनी भावानुवाद केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भांडारकर ओरिअन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट, श्री नवलमल फिरोदिया ऑडिटोरिअम, लॉ कॉलेज रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ललिता कुलकर्णी, पी. आर. एल. अहमदाबाद मधील निवृत्त वैज्ञानिक डॉ. एन. एम. अशोक, आयुकातील डॉ. रंजन गुप्ता, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूकर प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
माऊंटअबू येथील टेलिस्कोपच्या बांधणीच्या काळात डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी अनेकदा संवाद घडल्याचे डॉ. प्रमोद काळे यांनी सांगितले.
डॉ. संगीता गोडबोले पुस्तकाविषयी बोलताना म्हणाल्या, डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांचे इंग्रजीतील आत्मचरित्राचे हस्तलिखित माझ्या वाचनात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास कशापद्धतीने मार्गदर्शक ठरू शकतो याची जाणीव झाली. डॉ. कुलकर्णी यांच्यातील संशोधकवृत्ती, ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेले कष्ट, अथक परिश्रम आणि ध्यास हे माझ्या मनाला भिडले. यातून पुढील पिढीला संशोधन क्षेत्रात येण्याची जिद्द निर्माण व्हावी या विचाराने या पुस्तकाचा मराठी भाषेत भावानुवाद केला आहे. या पुस्तकाच्या निर्मितीत अनेक दिग्गज शास्त्रज्ञ-संशोधकांची मोलाची मदत झाली आहे.
ललिता कुलकर्णी म्हणाल्या, हे पुस्तक एका असाधारण बुद्धिमान व्यक्तीचे आत्मचरित्र आहे. डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन या पुस्तकातून घडते. डॉ. संगीता गोडबोले यांनी स्वत:चा व्यवसाय, संसार, छंद सांभाळून अथक प्रयत्नातून उत्तम भावानुवाद केला आहे.
डॉ. एन. एम. अशोक म्हणाले, डॉ. पी. व्ही. कुलकर्णी हे माझे गुरू होते. नाईट एअर ग्लो या क्षेत्रातील संशोधनात त्यांचे योगदान मोठे आहे. एक गुरू म्हणून त्यांना आपल्या शिष्याने गुरूपेक्षाही मोठे व्हावे अशी इच्छा होती.
डॉ. रंजन गुप्ता म्हणाले, डॉ. पी. व्ही. कुलकर्णी यांनी आम्ही गुरूजी या नावे संबोधत असू. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या हा प्रवास आनंददायी होता. सुरेश हिंगलासपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. व्ही. बी. शेवरे (निवृत्त वैज्ञानिक, पी. आर. एल. अहमदाबाद), डॉ. सुरेश नाईक (निवृत्त गटसंचालक, इस्रो), अरविंद कोलगे (निवृत्त अभियंता, एएसएसी, अहमदाबाद) यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. संयुक्ता कुलकर्णी यांनी केले तर आभार मधुवंती कुलकर्णी यांनी मानले.