ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आयोजित कार्यक्रमात गुरू-शिष्य परंपरेची महती अधोरेखित
पुणे : पखवाजचे धीरगंभीर बोल आणि बासरीच्या समधुर स्वरांनी ‘परंपरा’ या विशेष उपक्रमाअंतर्गत आयोजित सांगीतिक मैफलीत गुरू-शिष्यांनी रंग भरले. एकाच मंचावर गुरुंसह शिष्यांच्या वादनातून भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरेची महती अधोरेखित झाली.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आयोजित ‘परंपरा’ या मालिकेअंतर्गत पखवाज आणि बासरी वादनाची मैफल कोथरूडमधील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या शारदा रंगमंचावर आयोजित करण्यात आली होती.
‘परंपरा’ या मैफलीची सुरुवात सुखद मुंडे आणि त्यांचे शिष्य कृष्णा नवगिरे, हर्ष पाटील, मंगेश खैरनार आणि प्रदिप दराडे यांनी केली. मत्तताल, आदिताल ऐकवून पखवाज वादनाचे वैशिष्ट्य असलेली ‘गदी गण नागे तिट’ ही रचना ऐकविताना पखवाज जणू शब्दरूपी संवाद साधत असल्याची अनुभूती रसिकांना आली. पखवाज वादनातून सादर केलेली शिवस्तुती रसिकांना विशेष भावली. पखवाज वादनात प्रसिद्ध असलेले कुदोह सिंग आणि नाना पानसे घराण्यांचे वैशिष्ट्य असलेले विविध प्रकार वादनातून सादर करण्यात आले. मुख्यत्वे करून धृपद गायकीच्या साथीसाठी प्रसिद्ध असलेले पखवाज वादन ऐकविताना आलाप आणि जोड यांसाठी वाजविला जाणारा ‘झाला’ रसिकांना विशेष भावला. चक्रदार तोडा त्यातील फर्माईशी प्रकार तसेच गिनती प्रकार अत्यंत प्रभावीपणे सादर करून वादकांनी रसिकांना प्रभावित केले. कलाकारांना संतोष घंटे यांनी संवादिनीची सुमधुर साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंडित रूपक कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहडकर, लितेश जेठवा, मेहुल प्रजापती, तनय कामत, रिंगचड ब्रह्मा आणि रेणुका लिखिते यांचे बासरीवादन झाले. त्यांनी सरस्वती रागाची वैशिष्ट्ये उलगडून दाखविताना माधुर्यपूर्ण वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. रागविस्तार दर्शविताना पंडित रूपक कुलकर्णी यांच्या शिष्यांनी सुरेल साथ करत गुरू-शिष्य परंपरेतून मिळालेल्या ज्ञानाचे दर्शन घडविले. मैफलीची सांगता मैहर घराण्यातील बाबा अल्लाउद्दिन खाँ यांनी रचलेला राग ‘माज खमाज’ ऐकवून केली. महेशराज साळुंके यांनी केलेली तबलासाथ समर्पक ठरली.
‘परंपरा’ मैफलीच्या सुरुवातीस ऋत्विक फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या संस्थापिका चेतना कडले, संचालक प्रकाश गुरव यांच्यासह कलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कलाकारांचा सत्कार प्रकाश गुरव आणि चेतना कडले यांनी केला. सूत्रसंचालन, कलाकारांचा परिचय आणि आभार प्रदर्शन रश्मी वाठारे यांनी केले.