ड्रग्स प्रकरण ते पोर्श अपघायाचा तपास, पुण्याचे सुनील तांबे यांना राष्ट्रपती पदक

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांसह इतर सेवा दलांतील राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावं केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केलीत. महाराष्ट्रातील एकूण 43 पोलीस या पदकांचे मानकरी ठरले आहेत. यात पुण्यातील पोलिस उपअधीक्षक सुनील तांबे गुणवत्तापूर्ण सेवा पदकाचे (MSM) महाराष्ट्रातील मानकरी ठरले आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हा सन्मान सोहळा होणार आहे.

गेल्या ३६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असलेले सुनील तांबे यांची सुरुवात मुंबईत पोलिस उपनिरीक्षक म्हणून झाली. सध्या ते पुण्यात पोलिस उपअधीक्षक (Vigilance officer MS Prison) म्हणून कार्यरत आहेत. मुंबई सह सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरात त्यांनी काम केलं आहे.

१९९३ मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी सुनील तांबे यांनी मुंबई क्राईम ब्रांच मध्ये काम केलं. दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातील चोरी प्रकरणी सुनील तांबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तांबे हे पुण्यात २०१२ मध्ये झालेल्या जर्मन बेकरी स्फोटातील तपास पथकात होते. पुण्यातील २०१४ मध्ये फरासखाना बॉम्ब स्फोट प्रकरणाचा तपास सुनील तांबे यांनी केला. अरुण भेलके, हाफिज हमजा सारख्या नक्षलवाद्यांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुद्धा त्यांनी केलं.


सुनिल तांबे हे १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांना आपल्या ३६ वर्षांच्या सेवेत ४०० हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत. पोलीस महासंचालकाचे पदक २०१८ मध्ये मिळाले होते. दिवे आगर येथील गणेश मूर्तीच्या दागिने चोरीचा शोध लावल्याबद्दल गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. ३६०० किलो अंमली पदार्थ जप्त केलेल्या केसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ लाख रुपये जाहीर केले. त्या पथकात तांबे यांचा समावेश होता.


सर्वाधिक काळ पुण्यात कार्यरत असल्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीचा खडा न खडा त्यांना ओळखीचा आणि याचाच फायदा त्यांना पुणे शहरात सापडलेल्या ३६०० कोटी ड्रग्स प्रकरणात झाला. राज्य पोलिस दलातील सर्वाधिक ड्रग्स ची जप्ती पुण्यात झाली तेव्हा तांबे गुन्हे शाखेत सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. ड्रग्स माफिया ललित पाटील आणि त्याच्या रॅकेटचा उलगडा सुद्धा तांबे यांनी केला. मे २०२४ मध्ये झालेल्या पोर्शे अपघाताचा तपासाची जिम्मेदारी सुद्धा त्यांनी पेलवली.  पोलिस दलात काम करत असताना तांबे यांना अनेक वेळा राज्य सरकारतर्फे विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

Exit mobile version