डॉ. राधाकिशन पवार यांची बदली कुष्ठरोग उपसंचालक पदावर– कार्यकाळ संपण्‍याआधीच बदली

पुणे, धडाकेबाज पद्धतीने काम करणारे अधिकारी म्‍हणून ओळख असलेले पुणे परिमंडळाचे आरोग्‍य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांची आरोग्‍य विभागाने अचानक बदली कुष्‍ठरोग व क्षयरोग विभागाच्‍या उपसंचालक पदावर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षेद्वारे अवघ्या दीड वर्षांपूर्वी त्‍यांची नियुक्‍ती पुणे परिमंडळाचे उपसंचालक पदावर झालेली असताना व त्‍यांचा कार्यकाळ शिल्‍लक असताना प्रशासकीय कारण देत त्‍यांची बदली करण्‍यात आल्‍याने आरोग्‍य विभागाच्‍या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित होत आहे. डॉ. पवार यांनी पुणे परिमंडळाच्‍या उपसंचालक पदाची सूत्रे नोव्‍हेंबर २०२२ रोजी हातात घेतल्‍यानंतर त्‍यांनी पुणे, सोलापुर, सातारा या तीनही जिल्ह्यांमधील आरोग्‍य यंत्रणेला शिस्‍त लावली. कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांच्‍यावर त्‍यांनी कारवाई करत सर्वसामान्‍य नागरिकांना आरोग्‍य सुविधा मिळण्यासाठी सातत्‍याने जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले. इतकेच नव्‍हे तर नवीन रुग्णालयांची उभारणी, सुविधांमध्ये वाढ, शस्त्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि सीसीटीव्हीद्वारे रुग्णालयीन सेवा नियंत्रण यामुळे नागरिकांना दर्जेदार सेवा मिळू लागल्‍या. इतकेच नव्‍हे तर, डॉ. पवार यांनी शहरातील बड्या खासगी रुग्‍णालयांमध्‍ये आढळलेल्‍या त्रृटींवर कारवाई करत त्‍यांच्‍या मनमानीला चाप लावला. नुकत्‍याच दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालय प्रकरणात कोणाच्‍याही दबावाला बळी न पडता निष्‍पक्ष अहवाल शासनाला सादर केला. ............

वारीच्‍या तोंडावर बदली झाल्‍याने परिणाम
आषाढी वारी ९ ते १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वारीमध्‍ये आरोग्‍य खात्‍याचा महत्त्वाची भूमिका असते. वारकऱ्यांना स्‍वच्‍छ पिण्‍याचे पाणी मिळावे यापासून त्‍यांना औषधोपचार व रोगराई, साथीचे आजार पसरू नये याचे नियोजन करावे लागते. ही वारी पुणे परिमंडळाच्‍या तीनही जिल्ह्यांतून जात असल्‍याने त्‍याचे नियोजन आरोग्‍य उपसंचालकांना करावे लागते. मात्र, बदली केल्‍याने त्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता आहे.

डॉ. राधाकिशन पवार यांच्‍या कालावधीत झालेली कामेः
–पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मिळून १३ ग्रामीण रुग्णालये, ६ उपजिल्हा रुग्णालये, ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ अपघात विभाग सुरू
– बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या १.१८ कोटीवरून २.१८ कोटींवर, प्रयोगशाळा तपासण्‍या ८० लाखांवरून १.७२ कोटींपर्यंत वाढ
– १३९ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बांधकाम पूर्ण, पुणे जिल्ह्यातील १३ रुग्णालये सीसीटीव्हीद्वारे पुणे मंडळाशी जोडली.
– गर्भधारणेसंबंधी सेवांमध्येही लक्षणीय वाढ २०२१-२२ साली २.८५ लाखांवरून २०२४-२५ मध्‍ये ३.१५ लाखांवर
– सिझेरियन प्रसूती २५ हजार ७५३ वरून ३६ हजार ३०६
– रात्रीच्या वेळात करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया ७ हजार ७३७ वरून १० हजार ८२९
– नवजात बालकांच्‍या तपासणीमध्‍ये दुपटीने वाढ
– कर्करोग निदान व्हॅनद्वारे २१ लाखांहून अधिक तपासण्या ; १४४ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान
………….

Exit mobile version