मद्यपी कारचालकाने १२ जणांना उडवले, तिघेजण गंभीर
- जखमींमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा समावेश
पुणे, मद्यपी भरधाव कार चालकाने १३ जणांना उडवले. त्यानंतर कार चालकाने त्या विद्यार्थ्यांना फरफटत नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून,
तिघेजण गंभीर जखमी आहेत.कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जिल्हा धाराशिव) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जयराम मुळे हा सदाशिव पेठेतील एका मेडिकल दुकानात कामास आहे. त्याचा काल वाढदिवस होता. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने मित्राची गाडी घेतली. त्याच्याजवळ वाहन परवाना नसून, त्याला गाडी चालवता येत नाही. तरीही त्याने मित्राची गाडी घेतली. ज्याची गाडी आहे, तो गाडीबाहेरच थांबला होता. त्याने दुसऱ्या एका मित्राला गाडीत सोबत घेतले. त्याने गाडी सुरू केली आणि दुसऱ्या चौकातच टपरीजवळ चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवले.या अपघातात तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना संचेती रुग्णालयात तर इतर दहा जखमींना मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जयराम मुळे याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले आहे प्राथमिक चौकशी कार चालकाने मद्य सेवन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.