सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७६ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे:शिक्षणाने संपूर्ण जगाला आकार दिला पाहिजे अशी अवस्था आज जगामध्ये निर्माण झालेली आहे. विद्यापीठीय शिक्षणाचा उपयोग काय, त्याचा हेतू काय, त्याचे उद्दिष्ट काय? जगामधल्या ज्या समस्या आहेत त्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना सोडवता आल्या पाहिजे. विद्यापीठ शिक्षणाचे सर्वोच्च ध्येय हेच असलं पाहिजे. मानवाच्या ठाई अगोदरच जे पूर्णत्व विद्यमान आहे त्याचं संपूर्ण अविष्करण त्याची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण आहे, असे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शिक्षणातून मनुष्य घडवणं हेच शिक्षणाचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे असे प्रतिपादन विद्यावाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सोमवारी ७६ वा वर्धापन दिन विद्यापीठाच्या इनडोअर हॉल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) ज्योती भाकरे, सीएमए चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्रमुख पाहुणे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव, युवा गौरव पुरस्कारार्थी सोबत उत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर सेवक आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
लॉंग एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशन, सातत्याने चालणारे एज्युकेशन हा जो विचार वारंवार आधुनिक शिक्षणामध्ये केला जातो त्याचा विचार स्वामी विवेकानंदांनी अनेक वर्षांपूर्वी केला आहे. विद्यार्थी शिक्षणाकडे येत नसेल,तर शिक्षणाने उठून विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये अंतप्रेरणा जागवणारे, संशोधनाच्या नव्या वाटांकडे त्यांना नेणारे असे लोकशिक्षक संत या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये अनंत झाले. त्यांची भूमिका एकच होती कि, जितुके काही आपणास ठावे,ते ते दुसऱ्यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजन – सर्वजण हिताय सर्वजण सुखाय अशी संतांची भूमिका होती. हा सर्वांच्या हिताचा वसा शिक्षणातून देता आल पाहीजे असेही पुढे बोलतांना अभ्यंकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात समग्र कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ वसंत चिटणीस, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, पुरातत्व व मूर्तिस्थापत्य संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. तारा भवाळकर, योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमलता बीडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम, नामवंत शल्यविशारद डॉ. संजय कुलकर्णी, ज्येष्ठ प्राध्यापक व सहकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद तापकिर आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री. आर. एन. शिंदे या सन्माननीय व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण, कला इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाचा सर्वसमावेशक आलेख यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांसमोर मांडला. या समारंभाचे सूत्रसंचालन विद्यावाणीचे संचालक श्रीदत्त गायकवाड व श्रीमती श्रीयोगी मुंगी यांनी केले तर कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी यावेळी आभार मानले. विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्रशालेचे संचालक, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.