प्रसिद्ध लेखिका ललिता श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभ व आई विषयावरील कविसंमेलनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा आदर्श आई पुरस्कार प्रसिद्ध लेखिका ललिता श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांच्या हस्ते होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानपत्र, शाळ, श्रीफळ आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आई विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात भारती पांडे, प्रभा सोनवणे, वेदस्मृति कृती, मीना सातपुते, मीनाक्षी नवले, तनुजा चव्हाण, हेमंत केतकर, मिलिंद शेंडे, मिलिंद जोशी, सीताराम नरके, स्वप्नील पोरे, डॉ. ज्योती रहाळकर यांचा समावेश आहे.