गानवर्धनतर्फे स्वरगंधा टिळक स्मृती पुरस्काराने फैय्याज हुसेन खाँसाहेब आणि कुटुंबियांचा गौरव

आम्हा कुटुंबियांचा प्रत्येक श्वास संगीतासाठी समर्पित : उस्ताद फैय्याज हुसेन खाँ

पुणे : कष्टाशिवाय संगीत कला साध्य होत नाही, या क्षेत्रात यश मिळणे सोपे नाही. संगीत कला ही अशी गोष्ट आहे ज्यातून आयुष्यभर आनंद मिळतो. आम्ही कुटुंबिय संगीतासाठी जगत आहोत. आमचा प्रत्येक श्वास संगीतासाठी समर्पित आहे, असे भावोद्गार उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांनी काढले. कृ. गो. धर्माधिकारी यांनी गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मंच उपलब्ध करून दिला, त्यांना उचित मान दिला. गानवर्धन संस्थेचे कार्य आजही उत्तम तऱ्हेने सुरू आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

‌‘गानवर्धन‌’तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‌‘कै. सौ. स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार‌’ हरियाणातील झझ्झर घराण्यातील सात पिढ्यांची सांगीतिक परंपरा असलेल्या उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबियांना आज (दि. 10) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 40 हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे, कै. स्वरगंधा टिळक यांची कन्या आलापिनी जोशी, अन्वर हुसेन, एहजाज हुसेन, अली हुसेन, सायरा अली मंचावर होते. नारायणराव टिळक यांनी गानवर्धन संस्थेस दिलेल्या देणगीवर मिळणाऱ्या व्याजातून या पुरस्काराचे वितरण केले जात आहे.

उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब पुढे म्हणाले, उस्ताद उस्मान खाँसाहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे तुम्ही रसिक आमच्या कुटुंबियांवर भरभरून प्रेम करत आहात हे जाणवते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उस्ताद उस्मान खाँसाहेब म्हणाले, गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून कृ. गो. धर्माधिकारी यांनी अनेक होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ते संगीत क्षेत्रात कार्यरत नसतानाही गानवर्धन संस्थेची निर्मिती करून त्यांनी महान कार्य केले आहे. गानवर्धन संस्थेची सांगीतिक कुटुंब पुरस्कार ही संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

गानवर्धन संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका विशद करून प्रास्ताविकात दयानंद घोटकर यांनी फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबातील कलाकारांची ओळख करून दिली.

पुरस्काराविषयी बोलताना आलापिनी जोशी म्हणाल्या, माझी आई स्वरगंधा टिळक (सरस्वती काळे) यांनी वयाच्या आठव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. माझा मोठा मामा तबलावादक होता तर दुसरा मामा कार्यक्रमाची सर्व आखणी करीत असे. यातूनच माझे वडिल नारायणराव टिळक यांना सांगीतिक कुटुंब पुरस्काराची संकल्पना सुचली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर उस्ताद फैय्याज खाँसाहेब यांनी गानवर्धन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेस 51 हजार रुपयांची देणगी दिली.

गानवर्धन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण उस्ताद उस्मान खाँसाहेब यांच्या हस्ते झाले. स्पर्धेविषयीची माहिती स्पर्धा संयोजक डॉ. राजश्री महाजनी यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल गायन व वादनाचा ‌‘स्वरपरंपरा‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात उस्ताद फैय्याजहुसेन खाँसाहेब, अन्वर हुसेन, अली हुसेन, एहजाज हुसेन, श्रुती राऊत, विरींची जोगळेकर, मीना जोगळेकर, सायरा अली यांचा सहभाग होता. शंकर कुचेकर (तबला), सचिन भुमरे (गिटार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राडकर यांनी केले.

Exit mobile version