छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी १०:३० वाजता विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषद आमदार श्रीमती चित्रा वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला व त्यागाला वंदन करताना सर्व मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करत, त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अभूतपूर्व बलिदान दिले. त्यांचे शौर्य आणि निश्चय हा आजच्या तरुणांनी आदर्श मानावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि कार्य हे भारतीय इतिहासातील तेजस्वी पर्व आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Exit mobile version