निसर्ग व लोकसाहित्यातून मिळते लेखकांना प्रेरणा
विश्व मराठी संमेलनात ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या लेखकांचे मत
पुणे : ‘भाषेची निर्मिती निसर्गाच्या आवाजातून झाली असून, प्रकृती आणि लेखकाचे जिव्हाळ्याचे नाते असते, तर लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य लेखकांना प्रेरणा देते. त्या प्रेरणेतून लेखक स्वतःच्या जगण्याची चिकित्सा करत ज्ञानाचा शोध घेत सत्याला स्मरुन लिहितो,’ अशा शब्दांत ग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या साहित्यिकांनी प्रकृती, लोकसंस्कृती आणि लेखकाचे नाते उलगडले.
विश्व मराठी संमेलनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचावर आयोजित ‘ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य’ या परिसंवादात लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रतिमा इंगोले, कवी इंद्रजित भालेराव, लेखक-कादंबरीकार कृष्णात खोत, लेखक डॉ. संजीव गिरासे यांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. प्रभाकर देसाई यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला.
प्रतिमा इंगोले म्हणाल्या, ‘ग्रामीण वास्तवातून मी लेखनाकडे वळाले. आता खेडे आणि शहरे यांच्या सीमारेषा मिटत आहेत. तरीही खेड्यातील लोकांचे जगणे मांडले पाहिजे, या प्रेरणेतून मी त्यांच्या वेदना त्यांच्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करते. संत गाडगेबाबांनी प्रकृती आणि लेखकाचे नाते असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे मी देखील निसर्ग आणि महिलांशी जवळीक साधून लेखन करते. गावातील महिला दर दहा वाक्यांनंतर म्हणींचा वापर करतात. ही भाषेची श्रीमंती असून, बोलीतूनच भाषा निर्माण होते.’
इंद्रजित भालेराव म्हणाले, ‘मराठी भाषेला ज्या गाहा सत्तसई (गाथा सप्तशती) ग्रंथामुळे अभिजात दर्जा मिळाला, त्यामध्ये ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडण्यात आले आहे. त्यामध्ये लोकजीवन व लोकसाहित्याचा आविष्कार असून, या ग्रंथापासून ते बहिणाबाईंच्या ओव्यांपर्यंत लोकसाहित्यातून कविता लेखनाची प्रेरणा मिळाली.’
कृष्णात खोत म्हणाले, ‘हजारो वर्षांपूर्वीचे खेडे आजही आमच्या वाट्याला येणे ही भली गोष्ट नाही. पूर्वी लोक शेतीची भाषा बोलायचे, आता अन्न, वस्त्र, निवारा, वीज, शिक्षणाऐवजी राजकारणाची भाषा बोलतात. गाव आणि शहरातील भेद मिटल्यानंतरच लेखकाची अस्वस्थता कमी होईल. खऱ्या लेखकाने झुंडशाहीला अपराधबोधाची भावना करून दिली पाहिजे, तसेच सत्तेला सत्याचे स्मरण करून दिले पाहिजे. लेखक हाच खरा जनतेच्या पाठीचा कणा असतो.’
डॉ. संजीव गिरासे म्हणाले, ‘गावे प्रगतीपथावर असून, शहरांच्या जवळ येत आहेत. हा गाव शब्दबद्ध केला पाहिजे, या प्रेरणेतून लेखनाचे बीज स्फुलिंगित झाले. बोली भाषेतून लेखन करत गेलो, ज्याचे वाचकांनी स्वागत केले. आताही अनेक नव्या दमाचे लेखक ग्रामीण साहित्य लिहित आहेत.’