शेतक-यांसाठी महत्त्वाचा निर्णय : प्रशासक अरुण साकोरे यांची घोषणा
शिरुर :पाबळ येथे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वतीने बुधवार पासून शेळी, मेंढी व कोंबडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक अरुण साकोरे यांनी दिली. दरम्यान खरेदीदारांच्या मागणीवरुन हा बाजार सुरो करण्यात येत असल्याने शेतक-यांनी आपापल्याकडील शेळी, मेंढी व कोंबड्या दर बुधवारी सकाळी सहा पासून आणण्याचे आवाहन सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी केले.कोवीडपूर्वी पिंपळे-जगताप (ता.शिरूर) येथे जनावर बाजार सुरू करुन सहाच बाजारात तब्बल ५५ लाखांची उलाढाल केलेल्या शिरुर बाजार समितीला कोवीडमुळे सदर बाजार बंद करावा लागला होता. कोवीडनंतर शेतक-यांकडून पाबळ येथे मेंढी व कोंबडी बाजार सुरू करावा म्हणून आग्रह होता. त्यातच मुंबई, पुणे तसेच बेल्हे, चाकण व यवत येथील खरेदीदार व्यापा-यांकडूनही सदर बाजाराचा आग्रह गेल्या काही दिवसांपासून वाढता होता. याच पार्श्वभूमिवर वरील निर्णय घेतल्याची माहिती प्रशासक अरुण साकोरे, सचिव अनिल ढोकले यांनी दिली. सदर बाजार बुधवारपासून (ता.०५) पुढील दर बुधवारी कायमचा सकाळी सहा ते खरेदी-विक्री पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवला जाणार असून शेतकरी, व्यापारी यांना आवश्यक त्या सुविधांमध्ये प्रशस्त खरेदी-विक्री जागा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शेतकरी भवन, संरक्षक भिंती, सीसीटिव्ही आदींचा समावेश असून खरेदी-विक्री करणारांना कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण व्यवस्थाही बाजार समितीने केल्याचे उपसचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितले.