इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ
पुणे : हॅकेथॉनमुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना वाव मिळत असून, यातून उद्योजक घडण्याची प्रक्रिया सुरू होते. या संकल्पनांचा उपयोग हा सामाजिक समस्या सोडविण्यासोबतच, औद्योगिक आस्थापनांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी होणार आहे. या प्रकल्पातून उद्याचे स्टार्टअप विकसित होणार आहे. त्यामुळे अशा हॅकेथॉन स्पर्धांना समाजाने पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या वतीने ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ शनिवारी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेत सहभागी झालेले सुमारे १२०० विद्यार्थी विविध सामाजिक समस्यांवर उपाय शोधणार आहे. यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, इनोव्हेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश यादव आदी उपस्थित होते. एआयएसएसएमएस आयओआयटीच्या शैक्षणिक संकुलात ही स्पर्धा होत असून, स्पर्धेला विविध विद्यापीठांनी आणि शिखर संस्थांनी पाठिंबा दिला आहे.
डॉ. करमळकर म्हणाले की, या उपक्रमामुळे देशातील उद्योजकांना त्याच्या उद्योगात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विविध प्रकल्प आणि उपयांची माहिती युवा विद्यार्थ्याकडून मिळणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पांच्या विकासातून विद्यार्थ्याना चांगला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अशा उपक्रमशील कार्यक्रमाचा फायदा तरुणांनी घेतला पाहिजे, असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले. कल्पेश यादव म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवून, त्याचे सोल्युशन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या हॅकेथॉनच्या नोंदणीला देशभरातील अभियांत्रिकी महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आयआयटी, ट्रीपलआयटी यांच्यासह ३२३ संघ स्पर्धेत उतरले आहेत. डॉ. माने यांनी स्वागत करीत, स्पर्धेची माहिती दिली.
…..
संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा – डॉ. पराग काळकर
….
देशभरातील विविध महाविद्यालयातील ३२७ संघांनी सहभागी होत, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सामाजिकदृष्ट्या ही फार चांगली बाब आहे. आता विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वाहतूक, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण अशा क्षेत्रातील समस्या तंत्रज्ञानाच्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे हे नाविन्यपूर्ण प्रकल्प किंवा प्रोटोटाईप प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या महाविद्यालये, विद्यापीठे, इन्क्यूबेशन केंद्रांची मदत घ्यायची आहे. या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तयार आहे, अशी माहिती डॉ. पराग काळकर यांनी दिली.
यावेळी इनोव्हेशन फाउंडेशनचे पदाधिकारी तेजस यादव, प्रणव आडकर, नरेंद्र गडदे, निकुंज वाव्हळ, प्रसन्न चव्हाण, राजेंद्र पुरोहित, हर्षद पोरे, सोहित बनकर हे उपस्थित होते.