पुणे
पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोम’ रुग्णांची वाढती संख्या पाहता महात्मा फुले जन आरोग्य योजनेने या आजाराच्या उपचारासाठीचे असलेल्या दरांच्या मर्यादेत दुपटीने वाढ केली आहे. ही योजना असलेल्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून ८० हजार रुपये दिले जात असत. ती आता दुप्पट करत १ लाख ६० हजार केली आहे. याबाबतचे पत्र राज्य आरोग्य हमी सोसायटीने पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालकांना पाठवले आहे. आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले होते. त्यानुसार हे पॅकेज वाढवले असल्याचे पत्रात म्हटले आहे.
काय होईल फायदा?
ही योजना असलेल्या रुग्णालयांत ‘जीबीएस’ चे उपचार घेतल्यास ते पूर्णपणे मोफत होतील. त्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारता येणार नाहीत. त्यामुळे, रुग्णांचा फायदा होईल. यामध्ये कोणते रुग्णालये आहेत ही माहिती योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनेत पुण्यात ९९ रुग्णालये आहेत त्यापैकी महत्त्वाची रुग्णालये
१. आदित्य बिर्ला रुग्णालय, चिंचवड
२. एम्स रुग्णालय, औंध
३. भारती रुग्णालय, धनकवडी
४. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी
५. ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर रस्ता
६. श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय, नऱ्हे
७. सिम्बायोसिस रुग्णालय, लवळे
८. ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
९. वायसीएम रुग्णालय, पिंपरी
१०. सिद्धिविनायक रुग्णालय, बारामती मोरगाव रस्ता
११. जिल्हा रुग्णालय, औंध
असे असतील वाढलेल्या उपचारांचे दरः
उपचारांची शाखा – प्रक्रिया – खासगी रुग्णालयांना मिळणारे जास्तीत जास्त दर
न्यूरॉलॉजी – प्लाझ्मा एक्स्चेंज व संबंधित प्रक्रिया – ८० हजारापर्यंत
न्यूरॉलॉजी – इम्युनोग्लोब्यूलिन थेरपी, पाच दिवसांसाठी – २० हजारापर्यंत
न्यूरॉलॉजी – पंधरा दिवसांसाठी ‘जीबीएस’ चे व्यवस्थापन – ६० हजारापर्यंत
………..