SWAMIH फंडाअंतर्गत 50,000 घरे पूर्ण झाली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईतील गृहखरेदीदारांना त्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या
पुणे : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी निवडक गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांच्या चाव्या गृहखरेदीदारांना सुपूर्द केल्या. ह्या गृहखरेदीदारांनी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) काही अडचणीत असलेल्या प्रकल्पांमध्ये घरे खरेदी केली होती. हे प्रकल्प आर्थिक अडचणींमुळे रखडलेले होते. या प्रकल्पांना “स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड-इन्कम हाऊसिंग (SWAMIH I) इन्व्हेस्टमेंट फंड” अंतर्गत निधी मिळाल्यामुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकले.
माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या प्रकल्पांतील घरांच्या चाव्या खरेदीदारांना देण्यात आल्या. अनेक आर्थिक संकटांत अडकलेले प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा प्रकल्पांना आर्थिक मदत देऊन गृहखरेदीदारांना दिलासा देणे हा SWAMIH योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपला उद्देश साध्य करत SWAMIH फंडाने 50,000 घरे पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
अवंत हिलवेज, व्हिजन हाईट्स आणि शुभम ट्रायडेंट या प्रकल्पांमधील गृहखरेदीदारांना या कार्यक्रमात त्यांच्या चाव्या मिळाल्या. हे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या अडचणीत होते आणि त्यांना पूर्ण करण्यात अडथळे येत होते. SWAMIH (स्वस्त व मध्यम-उत्पन्न गटातील गृहनिर्माणासाठी विशेष निधी) फंडाने यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य पुरवले. परिस्थिती बदलून लोकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात या फंडाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
SWAMIH फंडची स्थापना 2019 मध्ये झाली. भारत सरकार द्वारे प्रायोजित असलेल्या ह्या फंड चे व्यवस्थापन स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपची एक उपकंपनी ‘SBI व्हेंचर्स लिमिटेड’ बघते. हा फंड भारतीय गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वात मोठा जनकल्याण फंड आहे. आर्थिक अडचणींमध्ये अडकलेल्या प्रकल्पांसाठी आणि ब्राऊनफिल्ड निवासी प्रकल्पांसाठी हा निधी महत्त्वपूर्ण आहे.
“ब्राऊनफिल्ड” हा शब्द मुख्यतः रिअल इस्टेट आणि विकास संदर्भात वापरला जातो. याचा अर्थ असा प्रकल्प, जिथे काही बांधकाम झाले आहे, परंतु त्याच प्रकल्पाचे काम अपूर्ण राहिले आहे. SWAMIH फंड या अपूर्ण प्रकल्पांसाठी आवश्यक वित्त पुरवण्याचे काम करतो. अनेक प्रकल्प अडचणीत असतात किंवा आर्थिक साधनांच्या अभावामुळे अपूर्ण राहतात, अशा प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी हा फंड मोठी मदत करतो.
जागतिक पातळीवर यापूर्वी असा कोणताही उपक्रम राबवण्यात आलेला नाही किंवा त्यासारखे तुलनात्मक उदाहरण उपलब्ध नाही. म्हणून, SWAMIH फंड हा एक अनोखा आणि नवा उपक्रम आहे. या प्रकारच्या गुंतवणुकीत केवळ आर्थिक नफा मिळवणे हा उद्देश नसून, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन हे मुख्य ध्येय आहे.
एसबीआय व्हेंचर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रेम प्रभाकर म्हणाले, “भारत सरकारच्या दूरदृष्टी आणि पाठिंब्यातून तयार झालेल्या ह्या निधीमुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे हजारो कुटुंबांचे स्वप्न साकार झाले आहे.”
आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेल्या अथवा रखडलेल्या प्रकल्पांना मदत देऊन, SWAMIH गृहकर्जवाढीला चालना देत आहे. परिणामी, मजबूत आणि समावेशक अर्थव्यवस्था घडवण्यासाठी हातभार लावत आहे.
५०,००० घरांच्या पूर्ततेचा ह्या महत्वपूर्ण टप्पा गाठून स्वामी फंडाने भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये आणि घर खरेदीदारांना दिलासा देण्यामध्ये असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. यामुळे भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाला बळ मिळाले आहे आणि घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली मदत मिळाली आहे.