भारतीय शैक्षणिक चित्रपट महोत्सवात डॉ. दामले यांनी मार्गदर्शन केलेल्या ११ लघुपटांना नामांकने

एका लघुपटाला ‘ सर्वोत्कृष्ट संकल्पना’ पुरस्कार

पुणे:पहिल्या भारतीय शैक्षणिक चित्रपट महोत्सवात पुणे येथील दिग्दर्शक डॉ.बाळकृष्ण दामले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ११ लघुपटांना नामांकने मिळाली असून एका लघुपटाला ‘ सर्वोत्कृष्ट संकल्पना’ पुरस्कार मिळाला आहे.कृष्णा विश्व विद्यापीठासाठी त्यांनी हे लघुपट केले.डॉ.दामले हे कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित ‘बी अ गुड समरिटन’ या लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट संकल्पना’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. युगांतरा कदम यांना ‘सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतात चित्रपटांद्वारे शैक्षणिक जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेशातील शाहजहाँपूर येथे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिला भारतीय शैक्षणिक चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला.नवोदित व व्यावसायिक चित्रपट निर्मात्यांना शैक्षणिक चित्रपट निर्मितीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, कॅमेरा, संपादन, प्रकाश, संगीत इत्यादी बारकावे समजून घेता यावेत, हा या महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश आहे.

या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा आणि कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version