शिक्षण, धाडस, इच्छाशक्तीच्या जोरावर
मराठी तरुणांना उद्योग उभारणी शक्य
विश्व मराठी संमेलनात मान्यवरांचे मत
पुणे:मराठी तरुण उद्योगाच्या क्षेत्रात मोठे काम करू शकतो. मात्र, त्यासाठी शिक्षण, धाडस, इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनावर भर देण्याचीही आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी मांडले.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांविषयी चर्चासत्र झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठीचे आनंद गानू यांनी सहभाग घेतला. जयू भाटकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. माशेलकर म्हणाले, आज जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे ज्ञानाधिष्ठित समाज, संशोधन करणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी २० हजार कोटी रुपयांची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. ही तरतूद उद्योगांसाठी महत्त्वाची आहे. संशोधनासाठी खूप खर्च येतो. मात्र तो खर्च उद्योग क्षेत्राकडून फार होत नाही. संशोधनाच्या जोरावर मोठी मजल मारणे शक्य आहे. भारतातील उद्योगांच्या एकूण उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. तसेच महत्त्वाच्या संशोधन संस्थाही महाराष्ट्रात आहेत. उद्योगांसाठी संशोधन आणि नवसंकल्पना गरजेच्या आहेत. आता मराठी तरूणांनी हनुमान उडी मारली पाहिजे. स्टार्टअपबाबत टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. राइट टू एज्युकेशनसह राइट एज्युकेशन आणि राइट वे ऑफ एज्युकेशन आवश्यक आहे. बदलत्या काळात शिक्षणाचा वेगळा विचार करणे, तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील परिणाम विचारात घेणे गरजेचे आहे.
बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कामांची माहिती देऊन गायकवाड म्हणाले, प्रत्येकामध्ये काही ना काही करण्याची ताकद आहे. मात्र, त्यासाठी ध्यास आणि इच्छाशक्ती असायला हवी. मराठी तरुणांनी जगावर राज्य केले पाहिजे. त्यासाठी धाडस केले पाहिजे, आपली कक्षा रुंद करावी लागेल. शिक्षण आणि उद्योगांची गरज यातील दरी दूर करण्याची आवश्यकता आहे.
उदरनिर्वाहासाठी देशाबाहेर गेलो. बाहेर गेल्यावर आपल्या देशात काय आहे याची जाणीव झाली. परदेशात काही वर्षे काम केल्यावर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे भारतात परत येऊन फार्मस्युटिक कंपनी सुरू केली. त्यातून माझी प्रगती झाली. गर्जे मराठीच्या माध्यमातून परदेशातील १५ हजार मराठी माणसांना एकत्र केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी, शिक्षणसाठी मदत केली जाते, असे गानू यांनी सांगितले.
सह्याद्री फार्म्सच्या वाटचालीची माहिती देताना शिंदे म्हणाले, शेती हा व्यवसाय सन्मानाने करणे शक्य आहे. जागतिकीकरणामुळे शेतीमध्ये फार बदल झाला नाही. तसेच सरकारची धोरणेही शेतकरी पूरक झाली नाहीत. २०१०मध्ये स्थापन झालेल्या सह्याद्री फार्मच्या माध्यमातून आजवर २६ हजार शेतकरी एकत्र आले आहेत. ४२ हजार एकर शेतीमधून विविध उत्पादने घेऊन विक्री, निर्यात केली जाते. आता नांदेडसह विविध जिल्ह्यांमध्येही काम सुरू झाले आहे. शहर आणि गाव ही दरी संपवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे.