पुणे : पुणे सेवासदन संस्थेच्या श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूलमध्ये २०२४-२५ च्या एस.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षणाच्या प्रवाहात अनेक वर्षांनी परतलेल्या आणि विविध वयोगटातील प्रौढ विद्यार्थिनींनी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने मिळवलेल्या यशाने सर्वांची मने जिंकली.
या शैक्षणिक वर्षात १० विद्यार्थिनींपैकी ९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून ९०% चा गौरवशाली निकाल शाळेने मिळवला.प्रथम क्रमांक: शिंदे सुकन्या – ७०.४०%,द्वितीय क्रमांक: कात्राबाद रेणुका – ६५.६०%, तृतीय क्रमांक: कांबळे कावेरी – ६१.८०% तर कचरावेचक काम करत शिक्षण पूर्ण करणारी प्रियंका कांबळे हिने ४७.६०% गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या धैर्याला आणि चिकाटीला उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांनी सलाम केला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, सहसचिव श्रीमती अर्चना शहाणे, प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती खोमणे, तसेच शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. पटवर्धन यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमती शहाणे यांनीही विद्यार्थिनींच्या संघर्षाला सलाम करत त्यांना प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मृणालिनी जोशी यांनी, सूत्रसंचालन श्रीमती अनुपमा बिराजदार यांनी व आभारप्रदर्शन श्रीमती तृप्ती जोगदे यांनी केले.
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेने अनेक महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून नवे जीवन दिले आहे. येथे कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय शिक्षण मिळते. शिकण्याची उमेद आणि यशाची जिद्द असेल, तर वय हे फक्त एक आकडा असतो, हे या शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीचा यशोगाथा सांगते.