ज्येष्ठ कथक गुरू पं.मनीषा साठे यांना ‘कला सारथी’ पुरस्कार
पुणे:ज्येष्ठ कथक गुरू पं. मनीषा साठे यांना बंगळुरूमध्ये आयोजित ‘भाव -२०२५’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवामध्ये ‘कला सारथी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्री श्री रविशंकर आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.’भाव २०२५’ हा भारतीय कला परंपरेला आधुनिक दृष्टिकोनातून सादर करणारा, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर’ येथे आयोजित हा सोहळा दि.२३ ते २६ जानेवारी दरम्यान तीन दिवस चालला. या महोत्सवात भारतातील मान्यवर कलाकारांनी अप्रतिम सादरीकरणे केली. कथक गुरू मनीषा साठे यांच्या नृत्य सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.मनीषा साठे यांच्यासमवेत या नृत्य सादरीकरणात शांभवी दांडेकर,तेजस्विनी साठे,सर्वेश्वरी साठे,आलापी जोग यांनी सहभाग घेतला.
‘मनीषा नृत्यालय’च्या संस्थापक असलेल्या,कथक नृत्याच्या क्षेत्रातील एक प्रेरक व्यक्तिमत्त्व असलेल्या गुरू पं.मनीषा साठे यांनी पाच दशकांहून अधिक कालखंडातील अप्रतिम योगदानाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या सृजनशीलतेसह तांत्रिक कौशल्य आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे त्या संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत. एक निष्ठावान मार्गदर्शक आणि दूरदर्शी नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांनी कथक परंपरेवर कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे, ज्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना आणि शिष्यांना प्रेरणा मिळाली आहे.