माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मत
पुणे:बांबूशी निगडित व्यवसायामुळे सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.डीईएसच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ने (आयएमडीआर) आयोजित केलेल्या ‘बांबू परिषदे’त प्रभू बोलत होते.
डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर आयएमडीआरच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, संचालिका डॉ. शिखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभू म्हणाले, “डिझायनिंग, मार्केट रिसर्च, सप्लाय चेन, विपणन धोरण, आर्थिक नियोजन अशा सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी बांबूशी निगडित व्यवसायामुळे निर्माण होतील. “बांबूपासून निर्माण केलेल्या उत्पादनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. या वस्तूंचे प्रमाणीकरण आणि औद्योगिक स्तरावर मोठ्या स्वरूपात उत्पादन करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. त्यासाठी शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.”
रावत म्हणाले, “बांबूपासून निर्माण केलेली उत्पादने खरेदी करताना आपण निसर्गाला हातभार लावतोय याचा आनंद होतो. या व्यवसायाला भरभराट येण्यासाठी शासनाने बांबू उत्पादकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.”