उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक – प्रदिप जांभळे पाटील
एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ‘युवोत्सव – २०२५’चे उद्घाटन
पिंपरी, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल; पण यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या कार्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे; याची माहिती असली पाहिजे. जबाबदारीने व्यवस्थापन केले तर आपण आपल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘युवोत्सव २०२५’ या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (दि.२७ फेब्रुवारी) सोनाली कुलकर्णी आणि पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. जे. अक्षय, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसबीपीएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते. युवोत्सव स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून यामध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट या स्पर्धा होणार आहेत. युवोत्सव क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे परिसरातील पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयामधील संघ सहभागी झाले आहेत. विजयी संघांना आकर्षक बक्षिसे व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
शासकीय, सामाजिक, शैक्षणिक अथवा युवोत्सव सारखे उपक्रम लोक सहभागातूनच यशस्वी होतात. त्यांना मान्यता प्राप्त होते. हे युवोत्सव स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येते. पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक नगरी बरोबरच सांस्कृतिक, क्रीडा नगरी अशीही ओळख निर्माण झाली आहे. महापालिकेने अनेक क्रीडांगणे विकसित केली आहेत. यामध्ये विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्न करत आहे, असे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक आहे असे प्रदिप जांभळे पाटील म्हणाले.
युवोत्सवाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा गुणांना वाव देऊन भारताचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य पीसीईटी करीत आहे. युवोत्सवाचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी संघ आणि खेळाडूंचे स्वागत करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या आयोजनात डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी खेळाडू, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार पायल झोरे, सुरज पाटील यांनी मानले.
.