पुणे मेट्रोने स्थानकावर मातृशक्ती नर्सिंग पॉड

पुणे मेट्रोच्या स्थानकांवर बसविण्यात आलेल्या ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’ चे लोकार्पण

पुणे :29 सप्टेंबर 2024 रोजी मा पंतप्रधान यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील भूमिगत मर्गिकेचे लोकार्पण संपन्न झाले. पुणे मेट्रोचा 32 किमीचा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी सुरू झालेला आहे. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 1 लाख 60 हजार आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये महिलांबरोबर लहान मुले देखील प्रवास करीत असतात. बऱ्याच वेळेला स्तनपान देणाऱ्या मातांना प्रवासादरम्यान आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी किंवा बाळाचे कपडे बदलण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, अश्या वेळी महिलांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत. अश्या मातांसाठी पुणे मेट्रोने स्थानकावर ‘ ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’ लावले आहेत. या पॉड चे लोकार्पण आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मा मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते पार पडले. यावेळी राज्यमंत्री महोदयांनी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सद्य स्थितीचा व भविष्यातील नवीन मर्गिकांचा आढावा घेतला.सोशल थम फाऊंडेशनच्या सहयोगाने पुणे मेट्रोने हे मातृशक्ती नर्सिंग पॉड जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्थानक या स्थानकांवर बसविले आहेत. हे नर्सिंग पॉड एका ठिकाणाहून दुसरी कडे अतिशय सहज पणे हलवता येऊ शकतात. हे पॉड पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये पंख्यांची देखील सोय करण्यात आलेली आहे. एका पॉडमध्ये एका वेळेस दोन माता आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकतात किंवा बाळाचे कपडे बदलू शकतात. यांमध्ये अग्निरोधक प्रणालीचा वापर केला गेला आहे. तसेच बाळाचे डायपर बदलणे, डायपर डीस्पोजल मशीन, डायपर वेंडिग मशीन व चार्जिंग पॉइंट अश्या व्यवस्था या पॉड मध्ये केलेल्या आहेत. मातांना पूर्णपणे आरामदायक अनुभवासाठी या पॉडची रचना असणार आहे. महिलांना निश्चिंतपणे या पॉड मध्ये बाळाची काळजी घेता यावी यासाठी ‘सेफ्टी लॉक’ लावण्यात आलेली आहेत.
या उद्घाटन प्रसंगी मा. मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी म्हंटले आहे की, “पुणे मेट्रो ही अतिशय छान अशी जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याला मिळाली आहे. स्वच्छ, स्वस्त आणि योग्य रखरखाव मेट्रो मध्ये ठेवण्यात आला आहे. आज या ठिकाणी स्तनपान देणाऱ्या मातांसाठी मातृशक्ती नर्सिंग पॉड लावून महिलांसाठी अतिशय गरजेची अशी व्यवस्था पुणे मेट्रोने उपलब्ध केली आहे. यामुळे माता आपल्या बाळांना मेट्रो प्रवासादरम्यान कोणतीही अडचण न येता स्तनपान देऊ शकतात व इतर गरजे प्रमाणे त्यांची योग्य काळजी घेऊ शकतात.”याप्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक  अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र सनेर-पाटील, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक सुजित कानडे व श्याम कुलकर्णी आणि इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सोशल थम फाऊंडेशन कडून अनुश्री जवांजल, अमृता उबाळे आणि अमोल कारंबे हे उपस्थित होते.

Exit mobile version