उच्च शिक्षण आणि जबाबदार समाज घटक म्हणून प्रत्येकाची भागीदारी
- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पुणे, – भारतीय शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीयीकरण वेगाने होऊन आपण अधिमान्य जागतिक शिक्षणव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत पण त्यासाठी उच्च शिक्षण आणि जबाबदार समाज घटक म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाने आपली भागीदारी निश्चित करायला हवी, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करत होते. याप्रसंगी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित होते.
उच्च शिक्षण ही एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयात येत आहे. त्यातून केवळ व्यक्तीचा नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या सर्वांगीण समृद्धीवर परीणाम होत असतो. त्यादृष्टीकोनातून भारतीय उच्च शिक्षणाकडे पाहिले गेले पाहिजे. तसेच वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि संसाधनाची कमतरता यासह जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये तरुणांमध्ये सक्षम करण्यात देखील उच्च शिक्षणाची मध्यवर्ती भूमिका आहे. ज्ञान व व्यावहारिक कौशल्ये उच्च शिक्षणातून तर मिळालेच पाहिजे परंतु त्यातून मूल्ये आणि गंभीर विचार करण्याची क्षमता प्रदान करता आली पाहिजे, समाजात अर्थपूर्ण मार्गाने आपले स्थान शोधायला मदत करता आली पाहिजे. शिक्षणामध्ये हे परिवर्तन अधिक महत्वाचे असल्याचे ते यावेळी बोलले.भारताच्या शतक महोत्सवानंतर पाठोपाठ विद्यापीठ आपला शतक महोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे प्रशासन, शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये /परिसंस्था आणि समाजातील घटकांना जोडून पुढील २५ वर्षाचा क्वांटम झेपेसाठी एक स्वतंत्र विभाग करून विकसित विद्यापीठासाठी एक धोरण ठरवावे आणि त्याची कालबद्ध अंमलबजावणी व्हावी तसेच भविष्यातील विद्यापीठ या अंतर्गत पंचसूत्री कार्यक्रम आखून समाजाच्या सर्व घटकांकडून सूचना, नव्या संकल्पना मागवून घेऊन लोकाभिमुख विद्यापीठ म्हणून नावलौकिक प्राप्त करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
भारत सरकारने नुकताच मराठी, प्राकृत आणि पाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. या तिन्ही भाषांचे विभाग विद्यापीठात असून त्या विभागांच्या ध्येयधोरणात विशेष विकासाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेला महत्व प्राप्त झाले असून विद्यापीठाने या उद्दिष्ठानुसार कार्यवाही सुरु केली आहे. शिक्षण मंत्रालय, युजीसी आणि भारतीय भाषा समितीने विद्यापीठाची मराठी भाषेसाठी नोडल विद्यापीठ म्हणून नेमणूक केली आहे. याद्वारे पाच वर्षात १००० पाठ्यपुस्तके निर्माण करण्यात येत आहे. सध्या ५० पाठयपुस्तके निर्मितीचा टप्पा प्रगतीपथावर आहे तसेच यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमातही नवी पाठयपुस्तके तयार करण्याची प्रक्रिया कार्यन्वित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत २०४७ हा संकल्प घेऊन सर्व भारतीय एकसंधपणे वाटचाल करीत असून या कार्यात आपण विद्यापीठ म्हणून सहभागी व्हायला हवे. कारण जगातील महत्वाच्या विद्यापीठाचे तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शैक्षणिक संस्थेचे आपण नेतृत्व करतो आहोत. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा विकास याच विशिष्ट उद्दिष्ठाने विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक तरुणाला पुढे न्यायाचे आहे, असेही कुलगुरूंनी यावेळी सांगितले.
भारतात उच्च शिक्षणातून अर्थार्जनाचे कौशल्य असलेली हुशार, पण आत्मकेंद्रित, संवेदनाहीन, चंगळवादी, करिअरिस्ट अशी पिढी सध्या घडत असून आज शिक्षणातून शील व करुणा हे घटक गायब झाल्याची खंत व्यक्त करत या पार्शवभूमीवर गौतम बुद्धांचा प्रज्ञा, शील व करुणा या विचाराकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहण्याचे आवाहनही डॉ. गोसावी यांनी यावेळी केले. या संबोधनात विद्यापीठात राबविण्यात येत असलेले आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या स्थापना दिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा डॉ. गोसावी यांनी यावेळी केली.
एनसीसीच्या संचलनपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर लहान मुलांना कुलगुरूंच्या हस्ते खाऊचे वाटप देखील करण्यात आले. याप्रसंगी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
.