श्रींच्या गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दरवर्षी रुजलेल्या परंपरेनुसार अभयांच्या हस्ते गणेश याग पूजन संपन्न …!
याग गणेश जन्माचा, सन्मान मंडळातील अभयांचा…!
पुणे :अभया महिलांनाही सर्वांसोबत सन्मानाने वावरण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक प्रबोधनात एक पाऊल पुढे पडावे म्हणून शनिवार साजरा झालेला गणेशजन्म सोहळा “अभया” महिलांच्या हस्ते श्री गणेश याग संपन्न झाला.
गणेशजन्माचे औचित्य साधून वस्तीतील सर्व “अभया” व महिला मंडळाचा हस्ते गणेश पूजन व गणेश याग करण्यात आला. विधीवत गणेश पूजन, आरती, नवग्रह पूजा थाटात पार पडली. महिलांनी बनवलेले मोदक, तीर्थ, प्रसाद सर्वांना देण्यात आले.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट), तावरे कॉलनी, अरण्येश्वर येथे वंचित विकास संस्थेच्या व मंडळाच्या माध्यमातून वस्ती विकास समृद्धी प्रकल्पा अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जातात.
यावेळी सर्व अभयांनी सकारात्मक पुढाकार घेऊन आजचा यज्ञ पार पाडला. गणेश यागाचा संपूर्ण विधी पार पाडणाऱ्या मुळे गुरुजी यांचेही आभार मानले.
गेली ३ वर्षांपासून अभयांच्या हस्ते पार पडत चाललेला गणेश याग समाजामध्ये एक महत्त्वाचा संदेश रूजवत आहे. महिलांमधील न्यूनगंड, एकटेपणाची व कमीपणाची भावना नष्ट करून, या महिला सर्वांसोबत सन्मानाने वावरण्यासाठी पुढे येत आहेत. हेच “अभया” अभियानाचे खरे यश आहे.