अंनिसच्या विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाचा समारोप
पुणे:जगामध्ये ज्या समाजाने तर्कनिष्ठ विचार लवकर स्वीकारले ते समाज पुढे गेले. भारतातील समाज हा ‘स्वसमूहश्रेष्ठतावादा’ च्या विळख्यात अडकल्यामुळे भारतामध्ये तर्कनिष्ठ विचार रुजविण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. सत्य शोधण्यासाठी तर्काचा वापर करणे अत्यंत गरजेचे असते असे प्रतिपादन तत्वज्ञानाचे प्राध्यापक चंद्रकांत खंडागळे यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या विवेक रेषा या चित्र प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
प्रा. खंडागळे पुढे म्हणाले की, लोक जर तर्कबुद्धी वापरून निर्भयपणे वागू लागले तर धर्म आणि राज सत्ताधाऱ्यांना ते अडचणीचे होते. म्हणून लोकांची ‘शरणागतवृत्ती’ वाढावी यासाठी हे सत्ताधारी अनेक प्रयत्न करत असतात. ‘शरणागतवृत्ती’ ही धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने सत्ताधारी वर्ग नेहमी धर्माचा उदो उदो करून लोकांना गुंगीत ठेवत असतो. हे चक्रव्यूह आपल्याला तर्कनिष्ठपणे ‘विवेकवादाचा’ वापर करून सोडवले पाहिजे.
अंनिसचे जिल्हाध्यक्ष व्ही. वाय. आबा पाटील म्हणाले की, समाजाची विसंगती दाखविण्यासाठी शब्दांची मर्यादा जिथे संपते तेथे व्यंगचित्र प्रभावी काम करते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक गवंडी यांनी सूत्रसंचालन राहुल थोरात तर स्वागत डॉ. संजय निटवे यांनी केले.
कार्यक्रमास निलम मागावे, सुजाता म्हेत्रे, वाघेश साळुंखे, सुनील भिंगे, सुहास यरोडकर, संजय गलगले उपस्थित होते.
अंधश्रद्धा निर्मूलनवर आधारित विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शनास सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला.