७ फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजन
पुणे :ज्येष्ठ कथक गुरू मनीषा साठे यांनी स्थापन केलेल्या ‘मनीषा नृत्यालय’ च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘स्वर्ण वंदना’ या भव्य कथक नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार,दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सॅन फ्रान्सिस्को, अमेरिकेत कार्यरत असलेल्या ‘शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक’ (SISK) संस्थेच्या प्रमुख शांभवी दांडेकर यांनी आयोजित केला आहे. या विशेष सादरीकरणात तीन पिढ्यांतील ५१ नर्तक एकाच मंचावर कथक गुरू-शिष्य परंपरेचा सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहेत.
‘स्वर्ण वंदना’ या ऐतिहासिक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कथक नृत्यांगना शांभवी दांडेकर आपल्या वरिष्ठ शिष्यांसह आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसह सहभागी होणार आहेत. यात अमृता परांजपे, अस्मिता ठाकूर, नेहा मुथीयान, प्राची फडणीस, शीतल लाळगे, रेश्मा नागर, श्रुती आपटे, मृणालिनी खटावकर, ईशा फडके आणि सोनल पेंडसे या कलाकारांसह त्यांच्या शिष्याही सहभाग घेणार आहेत.
या कार्यक्रमासाठी दिल्लीतील वरिष्ठ कथक गुरू पंडिता गीतांजली लाल या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच, प्रसिद्ध मराठी लेखिका, अभिनेत्री आणि टॉक शो सूत्रसंचालक मुग्धा गोडबोले या या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.या अविस्मरणीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिकिटे ticketkhidakee.com वर उपलब्ध आहेत.
मनीषा नृत्यालय विषयी
मनीषा नृत्यालयाची स्थापना १९७५ साली सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांनी पुण्यात केली. गेल्या ५० वर्षांत ही संस्था अनेक कथक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नृत्यालय विविध नृत्यसादरीकरणे, कार्यशाळा आणि प्रकल्पांच्या माध्यमातून कथक नृत्याचा प्रसार आणि संवर्धन करणार आहे. अधिक माहिती www.maneeshanrityalaya.com येथे उपलब्ध आहे.
SISK विषयी
शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक (SISK) या संस्थेची स्थापना कथक गुरू शांभवी दांडेकर यांनी कथक नृत्याचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने केली. SISK मार्फत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रशिक्षण तसेच ‘ग्लोबल डिस्टन्स लर्निंग प्रोग्रॅम’ चालवले जातात.
गुरू शांभवी दांडेकर या कथक नृत्यात प्रवीण, अध्यापक आणि नृत्यदिग्दर्शक असून त्यांचे गुरू त्यांची आई, कथक गुरू पंडिता मनीषा साठे आणि तबला वादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आहेत. मूळच्या पुण्याच्या असलेल्या शांभवी दांडेकर सध्या यूएसएमध्ये राहतात आणि जागतिक स्तरावर नृत्य सादर करतात तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
त्यांच्या ३४ वर्षांच्या व्यावसायिक नृत्य प्रवासात त्यांनी १३ देशांतील १२० हून अधिक शहरांमध्ये कार्यक्रम केले आहेत. नुकतेच त्यांना यूके-आधारित ‘द ह्युमन अॅटलास’ संस्थेने ‘सिलिकॉन व्हॅलीतील १०१ चेंजमेकर’ म्हणून सन्मानित केले आहे. अधिक माहिती www.siskdance.com येथे उपलब्ध आहे.
