शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्या बद्दल तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा – सुनील माने
पुणे :मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याचा बनाव रचून सरकारी यंत्रणांना वेठीस धरणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले, सोमवारी राज्याचे माजी मंत्री तसेच शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हा घरातून न सांगता निघून गेला. तो लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड विमानानं मित्रांसह बँकॉकला निघाल्याचं समोर आले. त्यानंतर तानाजी सावंतांनी त्यांचं राजकीय वजन वापरुन त्यांच्या मुलाला परत आणले. मात्र यासाठी शासकीय यंत्रणांना वेठीस धरण्यात आले. सर्वसामान्य लोक जेंव्हा पोलिसांकडे एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रार घेऊन जातात तेंव्हा पोलीस तत्काळ तो गुन्हा नोंद करत नाहीत. २४ तास त्या व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर याबाबत तक्रार घेतली जाते. त्यानंतर पोलीस अपहरण अथवा मिसिंगचा तपास सुरु करतात. ऋषिराजच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. तानाजी सावंतांनी याबाबत फोन करून पोलीसांच्या कंट्रोलरूमला माहिती दिली होती. त्यानंतर तत्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंद करण्यात आली. ऋषिराजचा त्याच्या वडिलांसोबत वाद झाल्यानंतर तो बँकॉकला निघाला होता. मात्र त्यांच्यातला गृहकलह लपवून ठेवत मुख्यमंत्र्यांना सावंत यांनी खोटी माहिती दिली. या माहिती नुसार मुख्यमंत्र्यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सूचना केल्या. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्या. त्यानंतर त्याचे काही तरी बरे वाईट होईल म्हणून एफआयआर दाखल करण्यात आला. अशाप्राकारे चुकीच्या माहितीच्या आधारे ऋषीराजचे विमान परत पुण्यात बोलवण्यात आले. आपण शासकीय यंत्रणांना कशा प्रकारे वेठीस धरतो, शासकीय यंत्रणा कशा प्रकारे आपल्यासाठी वापरतो त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणे, मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देणे, कौटुंबिक कलहाचा विषय सर्वजनिक पद्धतीने वापर करून यंत्रणांचा त्यासाठी वापर करणे हा गुन्हा ठरवला पाहिजे. आणि यासाठी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.