पुणे : अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या काळात छ. शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडिअम) दिल्ली येथे होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांची सन्माननीय निवड झाली आहे.
या साहित्य संमेलनातील कविकट्टासाठी कविता निवड समितीतर्फे टाकवे खुर्द येथील शाळेतील शिक्षक साहित्यिक संजय जगताप लिखित ‘ आई विश्वचि सारा ‘ या कवितेची निवड झाली असून सदर कविता २२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सादर होणार आहे. संजय जगताप यांनी आजतागायत पाच पुस्तकांचे लेखन केले असून विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड निर्माण करून पाच बालकाव्यसंग्रहाची निर्मिती व प्रकाशन केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत त्यांनी राज्य स्तरावर पुस्तक निर्मिती , अभ्यासक्रम निर्मिती , मार्गदर्शक पुस्तिका निर्मिती, व नवोपक्रम पुस्तिका निर्मिती व मासिक संपादनाचे काम व राज्यस्तरावर प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
साहित्य संमेलनातील प्रकाशन मंचावर संजय जगताप लिखित ‘लेखावली – प्रवास एका लेखणीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूर , इंडोनेशिया दुबई, नेपाळ येथे जगताप यांनी अभ्यास दौरा व विश्व साहित्य संमेलनात यशस्वी सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर कला सांस्कृतिक मंत्रालय आयोजित दिल्ली, राजस्थान, हैद्राबाद या ठिकाणी शासन आयोजित कार्यशाळेत सहभाग घेतलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता व लेख यांचे विविध वर्तमानपत्रे पुस्तके मासिके दिवाळी अंक यातून प्रकाशन झाले आहे. विविध साहित्य संमेलनांमध्ये अनेक वेळा त्यांनी कवितांचे सादरीकरण केले आहे.विविध आकाशवाणी केंद्रावर चार वेळा त्यांचे काव्यवाचन झाले आहे.
संजय जगताप यांनी आपले साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील अविस्मरणीय अनुभव ‘लेखावली’ या पुस्तकात रेखाटले असून त्याचा इतरांना प्रेरक म्हणून वापर होणार आहे. दिल्ली येथील मान्यवर संसदेचे निदेशक व साहित्यिक डॉ. अनुजकुमार यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली असून भारतीय आयुष मंत्रालय सदस्य व साहित्यिक डॉ राजाराम त्रिपाठी यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश दिला असून ते प्रकाशन समारंभास उपस्थित असणार आहेत.
दिल्ली येथील संमेलनात कविता सादरिकरण व पुस्तक प्रकाशन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याचे निवडपत्र देऊन संमेलन काव्यकट्टा अध्यक्ष राजन लाखे व संमेलन ग्रंथ निवड समिति अध्यक्ष मा घनश्याम पाटील यांनी कळविले आहे.संजय जगताप यांच्या या निवडीबद्दल राज्य शिक्षण विभाग व राज्यातील सर्व साहित्यिक क्षेत्रातील संबंधितांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.