प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे प्रतिपादन
पुणे– “छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी स्वराज्य बलाढ्य औरंगझेबाविरुद्ध किती पराक्रमाने लढले, या लढ्याचा इतिहास रोमहर्षक आहे. या लढ्याची सूत्रे स्वीकारली ती महापराक्रमी संताजी घोरपडे आणि त्यांच्या शूर सहकार्यांनी. सरदार संताजी घोरपडे या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या तळपत्या पराक्रमाच्या गाथेने मला साद घातली. त्याची परिणती ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाच्या लेखनात झाली”, असे मनोगत प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक आणि माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (IPS) यांनी मंगळवारी व्यक्त केले. ११ मार्च १६८९ या दिवशी औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली होती. मंगळवारी धर्मवीर शंभूराजांच्या स्मृती जागवणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून डॉ. शेखर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार, औरंगजेब, त्यांच्या लढाया विशेतः संताजी घोरपडे याविषयी डॉ. शेखर पाटील यांचा विशेष अभ्यास आहे.
डॉ. शेखर पाटील म्हणाले, “१६८३ ते १६९४ पर्यंतच्या काळात मराठी सैन्य संताजींच्या नेतृत्वाखाली औरंगझेबाशी लढत राहिले, हा इतिहास आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर वेढ्यात असतानाही, मराठी स्वराज्याचे सर्व अर्थांनी रक्षण आणि बलाढ्य शत्रूशी दोन हात अशी कामगिरी करणारे संताजी घोरपडे हे व्यक्तिमत्व मला सदैव साद घालत राहिले. त्यातूनच या काळाविषयीच्या माझ्या संशोधनाला चालना मिळाली, आणि ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाचे लेखन घडले. आता लवकरच या पुस्तकावर आधारित रणधुरंधर संताजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफी साठी प्रसिद्ध असलेले व विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेले दिग्दर्शक अमोल गोळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत”, अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी दिग्दर्शक अमोल गोळे, डॉ. अनिरुद्ध आंबेकर, करणसिंग बांदल, एकनाथ दुधे, आदित्य शेखर पाटील, निवृत्ती नवले तसेच घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे व मानसिंग घोरपडे तसेच अन्य घोरपडे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या पहिला पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
डॉ. शेखर पाटील पुढे म्हणाले, “शिवरायांचे जन्मस्थान असणार्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माझे लहानपण गेले. तेव्हापासून इतिहासाची गोडी लागली. अभ्यास सुरू झाला. अवघ्या २३ व्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यानंतरची ९ वर्षे त्यांनी औरंगझेबाशी अशा लढाया केल्या, की औरंगझेबाने विचार बदलून आधी निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही संपविण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण काळाचे संशोधन हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. सलग ५ वर्षे संशोधन, सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास, लढायांची माहिती. या काळाशी संबंधित प्रत्येक स्थळाला भेट देऊन, मी लेखन केले आहे. सर्व उपलब्ध कागदपत्रांचा मी अभ्यास केला आहे. सुमारे ८ वर्षे स्वराज्याचे सेनापती या नात्याने संताजी घोरपडे यांनी स्वराज्य जपले, राखले, आणि औरंगजेबाला हैराण केले. संताजींच्या महापराक्रमी कर्तृत्वाला आदरांजली म्हणून माझा लेखनप्रपंच आहे, त्या लेखनाचे चित्रपटरूपही लवकरच रसिकांसमोर येईल. या विशिष्ट काळातील इतिहास, आणि मराठी सरदारांचे महान कर्तृत्व सर्वांसमोर यावे, हाच उद्देश आहे”.
दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले, “ऐतिहासिक चित्रपट करताना वातावरणनिर्मिती, पेहराव, तत्कालीन वास्तू, वस्तू यांना सर्वाधिक महत्त्व असते, हे मी मंगल पांडे, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांसाठी काम करताना शिकलो आहे. ‘रणधुरंदर संताजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करताना हा अनुभव उपयोगी ठरेल. सुमारे वर्षभराच्या काळात हा चित्रपट रसिकांसमोर येईल, असा आमचा प्रयत्न राहील”.
घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे म्हणाले, “संताजी घोरपडे हा घराण्याचा अभिमान आहे. संताजींचे वडील मालोजी घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होते. या पितापुत्रांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले, त्याचे दर्शन यातून घडेल”, याचा विश्वास आहे.