तोरणा गडाच्या पायथ्याशी बिबट्याने शेळी केली ठार
तोरणा गडावरचा मुक्काम बिबट्याने हलवला मात्र गडाच्या पायथ्याशी बिबट्याची दहशत
वेल्हे (ता.राजगड) येथील शेतकरी राजेंद्र अशोक बोराणे यांची शेळी बिबट्याने ठार केल्याची घटना शनिवार(ता.२५) रोजी घडली असून शेतामध्ये चरायला गेलेला एक बोकड अद्यापही मिळून आला नसल्याने बिबट्याने तो ठार केला असावा
अशी शंका बोराणे यांनी व्यक्त केली आहे.
तोरणागड (ता.राजगड) परिसरामध्ये बिबट्या दिसून आल्यानंतर किल्ले तोरणागडावर बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर किल्ले तीन दिवसांसाठी तोरणागड बंद ठेवला होता. दरम्यान गुरुवार (ता.23) रोजी गडावर बिबट्या आढळून आला नसल्याने गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता मात्र गडाच्या पायथ्याला अनेक ठिकाणी बिबट्या पुन्हा निदर्शनास आला असून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातील कोंडीबा कचरे यांचा तीन वर्षाच्या बैलाचा बिबट्याने फडशा पडला असून किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गाव परिसरामध्ये अनेकांना बिबट्या दिसून आला आहे त्यातच बोराणे यांची शेळी ठार केली असल्याची माहिती वनपाल वैशाली हाडवळे यांनी दिली असून त्याबाबतचा पंचनामा वन विभागाच्या माध्यमातून केला असल्याची माहिती दिली.
याबाबत नागरिकांनी तसेच पर्यटकांनी किल्ल्यावर जाता येताना सुरक्षितेची काळजी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी केले आहे.