आपले भविष्य भारताचे संविधान’ राज्यस्तरीय वाचन आकलन स्पर्धा
पुणे दि. – संविधान ही माणुसकी असून माणसाने तो श्वास जपणं म्हणजे संविधान जपणं असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने दिग्दर्शक व एस. एम. जोशी सोशलिस्ट फांउडेशनचे विश्वस्त मा.जब्बार पटेल यांनी ‘आपले भविष्य भारताचे संविधान’ राज्यस्तरीय वाचन आकलन स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभामध्ये केले.पुणे येथे रविवारी (दि.२) एस.एम.जोशी सोशलिस्ट फांउडेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे सचिव साथी सुभाष लोमटे तर प्रमुख पाहुणे म्हणून इन्कमटॅक्स कमिशनर मा. संग्राम गायकवाड व संविधान अभ्यासक मा. सुरेश सावंत होते.
या कार्यक्रमात साथी सुभाष वारे लिखित पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या परिक्षेत राज्यातून १७०० जणांनी सहभाग घेतला होता त्यातील प्रथम आलेल्या ७५ जणांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी उपस्थित १८ स्पर्धकांनी कार्यक्रमात व्यक्त होताना संविधान व सद्य परिस्थिती यावर आधारित वक्तव्य करीत काठावर असलेल्या लोकांना मूळ प्रवाहात घेऊन जाण्याची आवश्यकता तसेच या स्पर्धेचे महत्व व गरज यावर मते व्यक्त केली.यावेळी सुरेश सावंत यांनी संविधान नैतिकता स्पष्ट करीत त्याची मूळ भूमिका विषद करीत त्याप्रमाणे आचरण करण्यासंदर्भात सविस्तर विवेचन केले. तर संग्राम गायकवाड यांनी संविधान हे समतेसाठी असून त्याचे मूळ कुटुंबातून सुरु होणे गरजेचे आहे. संविधानाचे अनुसरण करणे आणि त्याबद्दल जागृत राहणे, गरजेनुसार त्यात हस्तक्षेप करुणे गरजेचे आहे. उत्पन्न कर व इतर कर व संविधान यावर भाष्य करीत त्यांनी समानता प्रस्थापित करण्याची गरज स्पष्ट केली तसेच संवैधानिकता जपण्यासाठी एक चेक लिस्ट असणं आणि जपणं आवश्यक असल्याचे सांगितले.
जब्बार पटेल यांनी आपले संविधान हा श्वासा इतकाच महत्वाचा भाग आहे. राज्यघटना काय तर माणुसकी हे स्पष्ट करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिस्थिती याची मांडणी करीत आपलं संविधान जगात सर्वोत्कृष्ट मानवी मुल्यांचे असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले देव,धर्म या गोष्टी घरापुरत्या मर्यादित असाव्यात तुम्ही घराबाहेर पडला की तुम्ही केवळ भारतीय आहात. संविधान जपण्यासाठी त्यात जी माणुसकी महत्वाची आहे त्यादृष्टीने आपला स्वभाव, वागणूक, भूमिका, नितीमूल्य जपणं, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक अंगाने ते सजवणं गरजेचे आहे.अध्यक्षीय समारोपात साथी सुभाष लोमटे यांनी संविधान जपणं याच महत्व स्पष्ट करीत याचा प्रारंभ आपल्या स्वतःपासून, कुटुंबातून सर्व समाजात व्हावयास हवा हे विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख सोपान बंदावणे तर सूत्रसंचालन फाउंडेशनचे सहसचिव उपेंद्र टण्णू व पुष्पा क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ मिलिंद सावळे व साथीदारांच्या पोवाड्याने झाला. या कार्यक्रमात मोठ्या संखेने नागरिक सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या नियोजनात व्यवस्थापक राहुल भोसले, किरण पाटील, अमित धुमाळ, संतोष केंगले, शिवानी सुतकर, पार्वती सुतकर व सुलोचना कांबळे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.